पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिग तोडून ते जप्त केले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने खासगी ठेकेदाराची तब्बल तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. ठेकेदार होर्डिंग स्वखर्चाने तोडून त्या भंगारातून पालिकेस 99 टक्के भंगाराचे 22 रुपये किलो दराने रक्कम देणार आहे.
या कामासाठी प्रथम पालिकेने शुल्क देऊन एका एजन्सीची नियुक्ती केली होती. त्यावर सुमारे अडीच कोटीचा खर्च करण्यात आला. त्यानंतर त्यात बदल करून होर्डिंग तोडण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देऊन तसेच, वाहतुकीचा खर्च करून विकलेल्या भंगारातून पालिकेस रक्कम देण्याचे काम काढण्यात आले. त्यात अंतर्गत एक वर्ष काम करण्यात आले. ही निविदा संपल्याने नव्याने प्रक्रिया राबविण्यात आली. त्यास चार ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यात अरबाज इंजिनिअरिंग अॅण्ड सिव्हिल कन्स्ट्रक्शन यांची 99 टक्के दराची निविदा पात्र ठरली. ठेकेदार केवळ 1 टक्क्यामध्ये काम करणार आहे.
शहरात असलेले सर्व अनधिकृत जाहिरात होर्डिंग ठेकेदारामार्फत काढले जाणार आहे. त्यातून पालिकेस उत्पन्न मिळणार आहे. तसेच, पालिकेचा मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीचा खर्च वाचणार आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तोडून जप्त करण्यात येणार आहेत, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी सांगितले.