पुणे: अनधिकृत जाहिरात न करण्याचे आवाहन क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात येत आहे. मात्र, वडगाव शेरी, कल्याणनगर, विमाननगर, खराडी परिसरातील पथदिव्यांवर बांधकाम व्यावसायिक आणि खासगी क्लासेसच्या अनधिकृत जाहिराती मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या आहेत. पथदिवे जाहिरातीच्या विळख्यात अडकले आहे. यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहे.
वडगाव शेरी परिसरातील अनेक पथदिव्यांवर सध्या अनधिकृत जाहिरातींचे फ्लेक्स दिसत आहेत. परवानगी घेऊन पथदिव्यांवर फ्लेक्स लावल्यास लाखो रुपयांचे शुल्क महापालिकेला द्यावे लागते. त्याऐवजी राजकीय कार्यकर्त्यांना काही हजार रुपये दिल्यास विनापरवाना फ्लेक्स लावण्याची सोय होते. (Latest Pune News)
कार्यकर्ते एका पथदिव्यावर विनापरवाना फ्लेक्स लावण्यासाठी पाचशे ते दोन हजार रुपये घेतात. गुरुवार किंवा शुक्रवारी पथदिव्यांवर फ्लेक्स लावतात. शनिवार आणि रविवार महापालिकेला सुट्टी तसेच पुढील दोन दिवस अधिकार्यांवर राजकीय दबाव आणून फ्लेक्स आठवडा भर ठेवला जातात. एका आठवड्याचे जाहिरातदारांना लाख रुपयांपेक्षा जास्त पैसै मिळतात.
पथदिव्यावर ठराविक उंचीवर जाहिरातीचे फ्लेक्स लावल्यास अधिकारी कारवाई करत नाही, अशी माहिती जाहिरातदार खासगीमध्ये सांगतात. कार्यकर्त्यांच्या या कल्पनांमुळे वडगाव शेरी, कल्याणीनगर, खराडीमधील अनेक पथदिव्यांवर अनधिकृत जाहिरातींचे फ्लेक्स सध्या दिसत आहे.
पथदिव्यांच्या खांबांना फ्लेक्सचा विळखा
महापालिकेच्या हद्दीत फ्लेक्स लावण्यासाठी आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र महापालिकेचे शुल्क परवडत नसल्याने व्यावसायिक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते परवानगी घेण्याचे भानगडीत पडत नाही.
विनापरवाना राजकीय नेत्यांचे वाढदिवस, वर्षभरातील विविध सण, अभिनंदन, नियुक्तीचे फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिंग शहरातील चौकाचौकांत लावतात. तसेच बांधकाम व्यवसायिक, खासगी क्लासेस, हॉटेल व्यावसायिक पथदिव्यांच्या खांबांवर जाहिरात फ्लेक्स लावत असल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.
वडगाव शेरी, कल्याणनगर, विमाननगर, खराडी परिसरातील अनधिकृत जाहिरातींवर नियमित कारवाई केली जात आहे. तरही परिसरात अनधिकृत फ्लेक्स असल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
-विनोद लांडगे, अधिकारी, आकाश चिन्ह विभाग, वडगाव शेरी-नगररोड क्षेत्रीय कार्यालय