

भरत मल्लाव
भिगवण: बदलत्या हवामानाचा फटका यंदा उजनीत येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना चांगलाच बसला असून, राज्य व देशभरात नावाजलेले उजनीचे पर्यटन ओस पडले आहे. देश-विदेशातील आकाशयात्रींनी पाय आखडता घेतल्याने उजनीचा काठ कोमेजून पडला आहे.
उजनीचे खास आकर्षण असलेले अग्निपंखी अर्थात रोहित पक्ष्यांनी तर केवळ शे-दोनशेच्या संख्येवरच बोळवण केली आहे. दरवर्षी प्लेमिंगो हे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच दाखल होण्यास सुरुवात होतात. उजनीची पाणीपातळी फेबुवारी महिन्यात कमी होऊ लागताच देश-विदेशांतील पक्ष्यांचा प्रवास उजनीच्या दिशेने होतो. गेल्या वर्षी मे महिन्यातच पावसाने हाहाकार उडवला. त्यानंतर उजनीची पाणीपातळी उशिराने कमी झाली, त्यातच सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या तीव झळा प्राणी-पक्ष्यांना बसत आहेत. यंदाच्या हवामानात अधिकचा बदल पक्ष्यांच्या आगमनावर विपरीत परिणाम करून गेलेला दिसत आहे.
उजनी जलाशयात दर वर्षी फ्लेमिंगो तसेच चित्रबलाक, राखी बगळा, तापस, कांडेसर, करकोचा, शराटी, कुदळ्या, हळदी-कुंकू, चमचा, चक्रावक, प्लवर, चक्रांग, कापशी, बाह्मणी घार, गरुड, मत्स्य गरुड, पाणघार, शिक्रा, ससाणा, जांभळी पाणकोंबडी, वारकरी, तुतारी, शेकाट्या, सुरय, आदी जातींच्या पक्ष्यांची मांदियाळी पाहावयास मिळते. पक्ष्यांच्या कवायती, किलबिलाट, रंगसंगती पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत असते. त्यामुळेच तर राज्य व देशभरातील पर्यटकांचे पाय उजनीकडे वळत असतात. यंदा मात्र फेबुवारीपासून मे अखेरपर्यंत पक्ष्यांची प्रतीक्षाच लागून राहिली आहे. अगदी मोजक्या संख्येनेच पक्ष्यांनी उजनीत हजेरी लावल्याचे चित्र आहे.
यंदा स्थलांतरित पक्ष्यांची घट ही हवामान बदलाबरोबरच उजनीतील वाढते प्रदूषण, नष्ट झालेल्या पान वनस्पती, तसेच लहान मासेमारी व प्रदूषण, लहान देशी मासेही दुर्मीळ व नष्ट झाल्याचाही हा परिणाम असू शकतो, असे जाणकारांना वाटत आहे. पक्षी बसण्याच्या टेकडीवर मच्छिमार, गुरे, मानवी वर्दळ वाढली आहे. अंडी व पक्ष्यांची शिकार देखील होत असल्याचे पर्यटन चालकांचे मत आहे. एकंदरीत या यंदा उजनीच्या वैभवात भर टाकणारे स्थलांतरित पक्ष्यांचे थवे मोजक्याच संख्येने दिसत आहेत. यातून पर्यटनचालकांची आर्थिक कोंडी देखील झाली आहे.
स्थलांतरित पक्ष्यांवर हवामानबदलाचा हा मोठा परिणाम आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या निरीक्षणात असे दिसून आले आहे की, या पक्ष्यांचा थवा आधी निरीक्षण करून जातो व त्यांना योग्य वाटले तरच त्यांचे आगमन निश्चित होते. पाऊस लांबला किंवा जास्त झाला, तरी पक्ष्यांच्या आगमनावर याचा परिणाम जाणवतो, तसेच अन्नाची उपलब्धता, योग्य हवामान यावर देखील त्यांचे आगमन ठरत असते. उजनीत रासायनिक पाणी वाढले आहे, लहान मासेमारीमुळे खाद्य संपुष्टात आले आहे, बसण्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचाही हा परिणाम आहे.
डॉ. उन्मेष काटवटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी