उजनी बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान; राजकीय वरदहस्तामुळे उजनीची सुरक्षा धोक्यात

file photo
file photo

भिगवण : परप्रांतीयांच्या आडून उजनीच्या सुरक्षेला अतिरेकी धोका असल्याचा सरकारी अहवाल असताना वाळू व मासेमारीच्या निमित्ताने परजिल्ह्यासह परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे उजनीत बेकायदेशीर घुसखोरी करीत आहेत. यामध्ये घातक शस्त्रासह रिव्हॉल्व्हरधारक परराज्यातील तडीपार आणि गुन्हेगारांचा समावेश असल्याने उजनी गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनले आहे.

राजकीय वरदहस्त व अधिकार्‍यांना भेटणार्‍या चिरीमिरीमुळे उजनी धरणाची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. वाळू उपशाला व बेकायदा मासेमारी करण्यासाठी स्थानिक वाळू व फिशमाफियांकडून मजूर आणले जातात. आणलेल्या मजुरांची कुठेही नोंद केली जात नाही किंवा साधी चौकशी केली जात नाही. वाळू उपसा करण्यासाठी शक्यतो बिहारी मजूर आणले जातात. त्यामध्ये अनेक अट्टल गुन्हेगारांचा समावेश असतो. तिकडे त्यांच्यावर गंभीर गुन्हे किंवा तडीपारी अशी कारवाई झालेली असते. त्यामुळे या भागातील माफियांना अशाच डॅशींग गुन्हेगारांची गरज असते. स्थानिक माफिया व गुन्हेगारी एकत्र आल्याशिवाय वाळूसारखा धंदा चालू शकत नाही, हे यातील सूत्र असते. बेकायदा मासेमारीबाबत हेच सूत्र लागू होते.

उजनीची सुरक्षा लक्षात घेता परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणार्‍यांची कसून चौकशीची गरज आहे, कारण मजूर बनून येथे आश्रयाला आलेल्यांमध्ये गुन्हेगारांचा समावेश व्यवस्थेला घातक आहे. काही गुन्हेगार तर रिव्हॉल्व्हर व स्फोटक वस्तू बनवण्यात माहीर असल्याचे व उजनीत त्याचे प्रयोग केल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. त्याचप्रमाणे लहान अल्पवयीन मुलांचाही कामगार व मजुरांमध्ये समावेश केला जातो. लहान मुलांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे; मात्र तरीही वाळू व मासेमारी व्यवसायात सर्रासपणे अल्पवयीन मुलांचा समावेश दिसून येतो. कामाच्या निमित्ताने त्यांचा शारीरिक, मानसिक छळ सुरू असतो.

हे परप्रांतीय लोक एवढ्यावर गप्प बसत नाहीत तर ते पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार करीत असतात. उजनीत गळ, फासे, गलोरी आदी क्लृप्त्या लढवून पक्ष्यांची शिकार केली जाते. यावरही पर्यावरणवादी ब्र शब्द काढायला तयार नाहीत. एकंदरीत उजनी ही गुन्हेगारी जगतातील गुन्हेगारांना एका बाजूने लपण्याचे मोठे ठिकाण सापडले आहे, तर दुसर्‍या बाजूने स्थानिकांचा उदरनिर्वाह हिरावून घेत असताना अधिकार्‍यांची बेफिकिरी व सावळागोंधळ कधी तरी उजनीच्या मुळावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रमश:

अधिकार्‍यांना परिस्थितीची जाणीव व्हायला हवी

इकडे परप्रांतींयांच्या आडून उजनीच्या सुरक्षेला अतिरेकी धोका असल्याचा पत्रव्यवहार शासनस्तरावर 2008 मध्ये झाला आहे. त्यांनतर तरी झापड व गेंड्याची कातडी पांघरूण बसलेल्या अधिकार्‍यांना परिस्थितीची जाणीव व्हायला हवी. परंतु धरणाच्या सुरक्षेपेक्षा त्यांना चिरीमिरी महत्त्वाची ठरत आली आहे. गेल्या चार- पाच वर्षांपूर्वी बांगलादेशी मच्छिमार आढळून आल्याने अवघे प्रशासन तेवढ्यापुरते खडबडून जागे झाले आणि त्यानंतर तरी उजनीत येणार्‍यांची चौकशी होणे किंवा त्यांना प्रतिबंध घालणे, प्रसंगी कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु लाचारीपुढे सर्व व्यर्थ ठरत आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news