

पुणे: असुरी मताधिक्य असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल आहेत. मुळात भाजपला सरकारच चालवता येत नाही. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे, अशी कठोर टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शनिवारी (दि.4) केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. सभागृहात शिवसेना नेते संजय राऊत यांचीही उपस्थिती होती. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर कठोर शब्दात टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही टीकेचे लक्ष्य बनवले. तसेच, पूरग्रस्त शेतकरी, राज्यासह देशाची एकूण स्थिती, आगामी महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी, उद्धव- राज मनोमिलन अशा सर्वंच प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील, सचिव मंगेश फल्ले यांची उपस्थिती होती.
टिळक, आगरकरांची पत्रकारिता आहे काय?
मला प्रेमाने आमंत्रित केलं, त्याबद्दल आभार. पण मीच तुम्हाला विचारतो की, टिळक, आगरकरांची पत्रकारिता शिल्लक राहिली आहे काय ? सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न तुम्ही आज सरकारला विचारू शकता का? राजकारणातही तीच अवस्था आहे, असा उलट सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बिघडलेले राजकारण, समाजकारण, नैतिकता, न्यायव्यवस्थेकडून होणारे निवाडे, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न यावर परखड मते व्यक्त केली.
उद्धव ठाकरे उवाचं...
- ठाकरे ब्रँड आताचा नाही गेली अनेक वर्षे आहे. त्याचा जन्मच पुण्यातला आहे. त्यामुळे "बहनो और भाईयो, अपना रिश्ता बहुत पुराना है"
- आमच्या पक्षाचा मुंबईतील दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. आलेल्या लोकांना कोंडून ठेवायची गरज वाटली नाही, सगळे लोक पाऊस असूनही आले होते.
- देशाला पंतप्रधान, गृहमंत्रीच नाहीत हे सर्व एका पक्षाचे लोक येऊन बसले आहेत.
- सोनम वांगचूक यांची काय चूक? त्यांना का अटक केली? ते सरकार सांगत नाही. मणिपूरमध्ये काय चाललं आहे, याच्या बातम्या का दाखवल्या जात नाहीत?
- आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, भाजपसोबत होतो तेव्हा कडवट हिंदुत्व आणि भाजप सोडले की हिंदुत्व सोडले, असा अपप्रचार केला जात आहे.
- पाकिस्तानसोबत संबंध ठेवू नका, असे वारंवार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत, आम्हीही तेच सांगतोय. त्यांचे अतिरेकी आपल्या देशात येऊन हिंदुना गोळ्या घालताहेत अन् आम्ही त्यांच्या सोबत क्रिकेट कसे खेळू शकतो?
- भाजपने केले की अमरप्रेम, दुसऱ्याने केले की लव्ह जिहाद, असा सगळा प्रकार सुरू आहे. देश हिटलरशाहीकडे जात आहे.
- मी अन् राज २००५ पासून वेगळे झालो. आता आम्ही एकत्र आलो तर टीका का होते. कारण विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, हे तुम्हाला कळले असेलच.
- मी गद्दार आणि नमकहराम यांना उत्तर देऊ इच्छित नाही. (रामदास कदम यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर)
- शिव्या देणाऱ्यापेक्षा आशीर्वाद देणारे हात जास्त चांगले असतात.
- माझा पक्ष, नावं, चिन्हं... हे सगळ चोरणाऱ्यांचे कसले आले मेरीट? शिवसेना हे नाव माझ्या आजोबा अन् वडिलांनी ठेवले आहे, निवडणूक आयोग कोण आहे, आमचं नाव दुसऱ्यांना द्यायला?
- महापालिका निवडणुका मविआ आघाडीने एकत्रित लढवली पाहिजे. मात्र, स्वतंत्र लढण्याचंही स्वातंत्र्य आहे, ज्यांना वाटेल ते- ते स्वतंत्र लढू शकतात.
- भाजपने नाइट लाइफ विषय हा मकाऊचा घेतला. आमचा विषय वेगळा होता, मुंबईचे नाइट लाइफ वेगळे आहे. रात्रीची दुकाने, वाहतूक सुरू करण्याचा आमच्या सरकारचा विचार होता. पण भाजप वाले गुडघ्याचं काढून डोक्याला बांधत होते. आता त्यांनी तोच निर्णय घेतला.
- आपला देश चांगला आहे पण हिटरशाहीमुळे त्याचा नरक झाला आहे.
- भाजपला राज्य आणि केंद्रात सरकार चालवता येत नाही, अनेक प्रश्न आहेत.
- मी मधल्या काळात कोण बनेगा करोडपती पहिले, त्यात ऑप्शन असतात, तसे आहेत माझ्याकडे.
- सत्ता पाहिजे पण ती लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळी कोणी न मागता कर्जमाफी, शिवभोजन थाळी दिली होती, शेतकर्यांना मदत केली होती.
- नरेंद्र मोदी यांनी निवडणुका पाहून बिहारमध्ये महिलांच्या नावावर दहा हजार टाकले, जनता अडचणीत असणे हेच त्यांना हवे आहे.
- पुण्याबद्दल मला खूप कमी माहिती आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा पुण्यात दादागिरी होती, आता दादागिरी चालते का नाही माहिती. मी आजवर पुण्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. त्या बद्दल पुणेकरांची माफी मागतो. इथे शिवसेनेची ताकद आहे. मात्र, आम्ही आजवर आघाडीचे बळी पडलो. प्रेमाने बोलावले तर मी जरूर येईन. पण "मी पुन्हा येईन" असे म्हणत नाही.
- संजय राऊत सकाळी बोलतात ते मुख्यमंत्र्यांनी ऐकले तर त्यांचे चांगले होईल.
- माझा विरोध कोणाला नाही, मोदी ना फडवणीस. पण फडणवीस हतबल का झाले आहेत, हे कळत नाही?
- भ्रष्टाचार एवढा मोठा झाला आहे की त्यावर कारवाई होत नाही, मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत.
- पक्षापेक्षा देश आणि राज्य मजबुती ही महत्त्वाचे आहे. आम्ही हिंदू आहोत हे सांगण्यास भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही.