इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी (ता. इंदापूर) शिवारातील गलांडवाडी रस्त्यावरील उसाच्या शेतात दि. 12 जुलै रोजी प्रदीप रघुनाथ पवार (वय 26, रा. रामतीर्थ तांडा, जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याचा खून करून फेकलेला मृतदेह मिळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य सुभाष मोरे (वय 20, रा. गुत्ती, जि. लातूर) व बालाजी वसंत माने (वय 26, रा. गीताईनगर, ता. उदगीर, जि. लातूर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार यांच्या मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. याबाबतचे वृत्त असे की, यातील वरील दोघे व त्यांचे दोन साथीदार यांनी दि. 6 जुलै रोजी उदगीर येथे चारचाकी गाडी भाड्याने घेऊन ते स्वत: गाडी चालवून हैदराबाद, अक्कलकोट, गाणगापूर, जेजुरी, पुणे असा प्रवास करून 11 जुलै रोजी रात्री पुणे येथून लातूर येथे निघाले होते.
त्या वेळी प्रमोद पवार हा हडपसर गाडीतळ येथून सोलापूर येथे जाण्यासाठी थांबला होता. त्यास सोलापूर येथे सोडतो, असे बोलून गाडीमध्ये बसवून प्रवासादरम्यान त्याच्याकडील पैसे व मोबाईल घेण्यासाठी त्यास मारहाण करून गाडीतीलच दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. यानंतर प्रमोदच्या संपूर्ण शरीराला बांधून त्यास गाडीतून उचलून सरडेवाडी शिवारातील गलांडवाडी रस्त्यावरील उसाच्या शेतात डोक्यात मोठा दगड मारून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून, न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगटे, प्रकाश पवार व पोलिस पथकाने ही कारवाई केली.