लोणी काळभोरचे दोन प्रबळ विरोधी गट एकत्र

लोणी काळभोरचे दोन प्रबळ विरोधी गट एकत्र

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोणी काळभोर येथील सहकारातील दोन कडव्या विरोधी गटांचे मनोमिलन झाले असून, या पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अनेक वर्षांनंतर हवेली तालुक्यातील सहकारातील निवडणुका सुरू झाल्या. गेल्या वर्षी हवेली बाजार समितीची निवडणूक झाली तर मागील पंधरा वर्षांपासून निवडणूक न झालेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे.  हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रावर लोणी काळभोर गावचा मोठा प्रभाव होता. सहकारमहर्षी कै. अशोक काळभोर यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते. जिल्हा बँक, बाजार समिती, यशवंत साखर कारखाना या संस्थेत अशोक काळभोर यांनी काम केले. याच गावात जेष्ठ नेते यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांचा प्रबळ गट होता.

सहकारातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी एकमेकांच्या गटाच्या विरोधात लढविल्या. परंतु. या दोन्ही गटांनी आता हवेली तालुक्याला एक वेगळा आदर्श दाखवला आहे. मागील चाळीस वर्षांचा राजकीय विरोध संपवून या पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्धार केला आहे.
या मनोमिलन बैठकीस ज्येष्ठ नेते माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास आण्णा काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, काँग्रेस नेते शिवदास काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब रंगनाथ काळभोर, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर आदी गावातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
लोणी काळभोरच्या या दोन राजकीय गटांच्या झालेल्या मनोमिलनाचे स्वागत संपूर्ण हवेली तालुक्यात झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news