

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या सुधारित 2023 च्या आकृतीबंधात अभियांत्रिकी विभागातील शहर अभियंता या पदाला समकक्ष दर्जाचे मुख्य अभियंता ही दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुक अधिकार्यांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. त्या जागेवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या विविध पदांच्या आकृतीबंधास महाराष्ट्र शासनच्या नगरसचिव विभागाने मान्यता दिली आहे. पालिकेचा समावेश 'ब' वर्ग पालिकेत झाला आहे. नगरसचिव विभागाने पुणे पालिकेच्या धर्तीवर आकृतीबंध तयार करण्याबाबत सुचीत केले आहे. त्यानुसार सुधारित आकृतीबंध 2023 तयार करून पालिकेने मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे.
पालिका कार्यक्षेत्रात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तसेच, पालिकेत सीमेवरील 7 गावांचा समावेश होणार आहे. पालिकेचा कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन पुणे पालिकेच्या धर्तीवर शहर अभियंता यांची वेतनश्रेणी बांधकाम विभागाच्या समकक्ष करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, शहर अभियंता पदाला समकक्ष मुख्य अभियंता ही दोन नवे पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याचेही वेतन शहर अभियंता पदाप्रमाणे असणार आहे. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
पालिकेत सध्या मकरंद निकम हे शहर अभियंता आहेत. मुख्य अभियंता या नव्या पदाची खुर्ची मिळावी म्हणून पालिकेतील काही वरिष्ठ अधिकार्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पदावर कोणाची वर्णी लागते ? याची उत्सुकता पालिका वर्तुळात निर्माण झाली आहे.
अतिरिक्त आयुक्त पदाच्या निकषात बदल
अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) हे पद आयएएस अधिकार्यांसाठी राखीव करण्यात आले आहे. त्याची नेमणूक राज्य शासनाकडून होईल. त्यामुळे या पुढे आयुक्तासह अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) हे दोन्ही अधिकारी आयएएस दर्जाचे असणार आहेत. अतिरिक्त आयुक्त (क्रमांक दोन) हे पद शासनाचे सहसचिव, उपसचिव दर्जाचे किंवा मुख्य अधिकार्यांसाठी राखीव असणार आहे.
त्याची नेमणूक शासनाकडून होईल. अतिरिक्त आयुक्त (क्रमांक तीन) हे पद पालिका आस्थापनेवरील अधिकार्यांसाठी राखीव होते. त्यात बदल करून शासन वेळोवेळी त्या अर्हतेत बदल करेल तसे बदल लागू राहतील. पालिकेच्या तीनही अतिरिक्त आयुक्त पदाच्या निकषातील बदलास आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.