

पुणे/येरवडा : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून पूर्वनियोजित कट करून दोघा सराईत गुन्हेगारांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना येरवड्यातील पांडू लमाण वस्तीत माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयासमोर शनिवारी (दि.12) पहाटे तीन वाजता घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरा दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर(35) आणि सुभाष ऊर्फ पापा किसन राठोड (40, दोघेही रा. लमाण तांडा, येरवडा) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष राठोड याचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तोदेखील आरोपींच्या हल्ल्यात जखमी झाला आहे.
त्यानुसार पोलिसांनी, शंकर मानू चव्हाण (55), बादल शंकर चव्हाण (25), विकास शंकर चव्हाण (28), अनिल महेश देवरा (50), रोहित ऊर्फ निखिल परशुराम संके (20), निशांत तायप्पा चलवादी (20), कृष्णा उर्फ काल्या (20, सर्व जण रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) व इतर चार अनोळखी साथीदार अशा अकरा ते बारा जणांच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, शंकर चव्हाण, बादल चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राठोड आणि शंकर चव्हाण यांच्यात पूर्वीपासून वाद होते. तेरा वर्षांपूर्वी शंकर चव्हाण याच्यावर सुभाष राठोड याने गोळीबार केला होता. त्या गुन्ह्यात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मण राठोड दुचाकीवरून घरी निघाले होते. तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ त्यांचा लहान भाऊ सुभाष आणि त्याचा मित्र अनिल वाल्हेकर पायी घराकडे जाताना दिसले. त्यानंतर तिघे दुचाकीवर बसून घराकडे निघाले होते.
नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयासमोर आले असता, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांना अडविले. त्यानंतर रोहित संके व निशांत चलवादी यांनी कोयत्याने सुभाष यांच्या डोक्यात वार केला. त्या वेळी तिघे दुचाकीवरून खाली पडले. इतर आरोपींनी तिघांवर वार करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार सुरू असताना, बादल चव्हाण, विकास चव्हाण, अनिल देवरा हे ऑफिससमोर उभे राहून मारा त्यांना जिवंत सोडू नका, असे ओरडत होते.
त्या वेळी शंकर चव्हाण हादेखील मोठ्याने ओरडून तिघांना मारून टाकण्यास सांगत होता. टोळक्याने सुभाष आणि अनिल या दोघांना डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांना अतिशय क्रूरपणे चेहरा ठेचून मारण्यात आले आहे. फिर्यादींच्यादेखील डोक्यात वार झाला. त्यांनी तेथून पळ काढून घर गाठले. हा प्रकार घडल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दोघेही मृत घटना घडलेल्या जागेपासून काही मीटरच्या अंतरावरच राहतात. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
दोघे मृतही सराईत गुन्हेगार
दोघाही मृतांवर खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे गुन्हे दाखल होते. सुभाष राठोडला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात 2008 मध्ये शिक्षा झाली होती. यानंतर 2014 मध्ये तो शिक्षा भोगून बाहेर आला. यानंतर त्याने पुन्हा परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. यामुळे ते पुन्हा प्रतिस्पर्धी टोळीच्या डोळ्यावर आला होता. त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. यानंतरही त्यांची दहशत कायम होती.
पांडू लमाण वस्तीला पोलिस छावणीचे स्वरूप
येरवड्यातील पांडू लमाण वस्ती भागात असलेल्या माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयसमोरच ही घटना घडली. आरोपी आणि मयत व्यक्ती यांची घरे शेजारीच आहेत. त्यामुळे शनिवारी दिवसभर या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांसह तीस ते चाळीस पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
वाल्हेकर, राठोड हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांचा खून केल्याप्रकरणात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
बाळकृष्ण कदम,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे