

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत मैला चेंबर साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली. मच्छिंद्र दादाभाऊ काळे (वय 42, रा. शिंदोडी ता. शिरूर) व सुभाष सुखदेव उघडे (वय 34, रा. शिरूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. याबाबत दत्तात्रय दादाभाऊ काळे (रा. शिंदोडी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे, मयत सुभाष सुखदेव उघडे हे एका कंपनीतील ट्रिम एरियाजवळील मैला चेंबरमध्ये काम करीत असताना पाय घसरून चेंबरमध्ये पडले. त्या वेळी मच्छींद्र दादाभाऊ काळे याने चेंबरमध्ये उडी टाकून उघडे यास वर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तेसुद्धा चेंबरमध्ये पडले.
या दोघांना उपचारासाठी शिरूर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही घटना समजताच रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे व सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेचा तपास रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करीत आहेत.