भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आडगाव गावच्या पाझर तलावात पोहण्यास गेलेली दोन मुले पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ३०) दुपारच्या दरम्यान घडली. या घटनेने आडगाव गावावर शोककळा पसरली आहे. मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांना शोध कार्य करून मृतदेह पाण्याबाहेर सोमवारी (दि. ३१) सकाळी ११.३० वाजता काढण्यात एनडीआरएफ (NDRF) च्या टीमला यश आले.
येथील पाझर तलावात तीन मुले दुपारच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते. पोहताना तलावातील पाण्यात बुडून सार्थक राजेंद्र ढोरे (वय १५) व शिवम शंकर गोपाळे (वय १६) यांचा मृत्यू झाला, तर नशीब बलवत्तर म्हणून प्रतीक संजय गोपाळे (वय १५) हा बचावला आहे. बुडणाऱ्या मुलांना तलावातील पाण्याबाहेर काढताना पहिल्या दिवशी मात्र स्थानिक ग्रामस्थांना यश आले नाही. ग्रामस्थांनी खूप प्रयत्न करून प्रतिकला वाचविण्यात यश आले. दोन मुलांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरून नातेवाईकांवर मोठा आघात झाला. लहान मुलांच्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सार्थक ढोरे हा आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुट्टीत आला होता.
पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचे काम पोलीस प्रशासन व गावकरी यांच्या मदतीने रविवारी (दि. ३०) केले असता दोन्ही मुलांचा शोध सायंकाळपर्यंत लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम व एनडीआरएफ जवान यांना कळविले. त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा शोध घेतला आणि यश आले. घटनास्थळी मृत मुलांचे नातेवाईक व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही मुलांच्या आई वडिलांसह नातेवाईक यांच्या अक्रोशाने वातावरण अतिशय शोकाकुल झाले होते. पाण्यात बुडालेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी असता टीम, चाकण पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि गावचे ग्रामस्थांसह नातेवाईकांनी एकत्रित प्रयत्न केले.