लोहगावला जाण्यासाठी दोन पर्यायी रस्त्यांचा प्रस्ताव

लोहगावला जाण्यासाठी दोन पर्यायी रस्त्यांचा प्रस्ताव
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी लोहगावला जाणारा अस्तित्वातील रस्ता बंद करून त्याऐवजी दोन पर्यायी  रस्त्यांचा प्रस्ताव महापालिकेने संरक्षण विभागाला सादर केला आहे. या पर्यायी रस्त्यामुळे बर्माशेल झोपडपट्टीला धक्का लागणार नसून, विमानतळाची धावपट्टीही शक्य होणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
लोहगाव (पुणे) विमानतळाची धावपट्टी वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी विकफिल्डपासून लोहगावकडे जाणारा सद्य:स्थितीतील अस्तित्वात असलेला रस्ता बंद करण्याचा निर्णय महापालिका आणि हवाई दल यांनी घेतला आहे.  सद्य:स्थितीत विमाननगर आणि येरवडा परिसरातून लोहगावला जाण्यासाठी विमानतळाशेजारून जाणारा अस्तित्वातील रस्ता हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता आखून तो विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
त्यानुसार महापालिकेच्या आणि हवाई दलाच्या पथ विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. दरम्यान स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी येथील बर्माशेल झोपडपट्टीला धक्का न लावता पर्यायी रस्ता सुचवावा, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार प्रशासनाने दोन पर्यायी रस्त्यांचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यात 24 मीटर रुंदीचा दीड कि. मी.चा आणि एक कि. मी.चा एक असे दोन रस्ते असून,  हे प्रस्ताव संरक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सादर करण्यात आले. संरक्षण विभागाकडून त्यास परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

हे आहेत रस्त्यांचे दोन पर्याय

पर्याय क्र. 1- हा एक किमीचा रस्ता असून, तो 509 चौकातून बर्माशेल झोपडपट्टीच्या कडेने पुढे संरक्षण विभागाच्या भिंतीच्या कडेने पुढे खाणीपासून कलवडवस्तीलगत मूळ रस्त्याला येत आहे. पर्याय क्र. 2 – केंद्रीय विद्यालयाच्या मोकळ्या जागेतून हा दीड कि. मी. रस्ता प्रस्तावित असून, तो पुढे संरक्षण विभागाच्या संरक्षक भिंतीच्या कडेने खाणीपासून कलवडवस्तीलगत मूळ रस्त्याला जोडला जात आहे.

धानोरीमार्गे लोहगावला जाता येणार

509 चौकातून बर्माशेल झोपडपट्टीच्या कडेने पुढे जाणारा रस्ता पुढे धानोरीकडे जाणार्‍या डीपी रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे येरवड्याकडून थेट धानोरी, पोरवाल रस्ता, तसेच लोहगावला जाता येणे शक्य आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news