

देहूरोड; पुढारी वृत्तसेवा : समाजात अनेक साधू असतात. परंतु, यामधील अनेकांनी साधूपणाचे ढोंग घेतलेले असते. अशा साधूपणाचे ढोंग घेतलेल्यांचा बुरखा जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी फाडला, असे संत मोरारी बापू मंगळवारी प्रीती अभंगाचा अर्थ समजून सांगताना म्हणाले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आयोजित आणि जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, देहू निमंत्रित देहूनगरीत आयोजित रामकथेत मोरारी बापू बोलत होते.
या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील उपस्थित होते. मोरारी बापू म्हणाले, की साधूचा वेश परिधान करून अनेकजण नाना कला करतात. गळ्यात तुळशीच्या माळा, डोक्यावर शेंडी अशा नाना तर्हेच्या युक्त्या करतात. सोबत ज्ञान देणारे ग्रंथ ठेवणारे दांभिक असतात. अशांचा बुरखा तुकाराम महाराजांनी फाडला आहे.
…तर प्रेम अभंगापर्यंत सफल व्हायचे भाग्य मिळेल
मोरारी बापू म्हणाले, की प्रेमाच्या मार्गातील पाच अडसर दूर केले, तर प्रेम अभंगापर्यंत सफल व्हायचे भाग्य मिळेल. हे पाच रिस्की सेक्टर आहेत. कुसंग, व्यसन, गुरू निष्ठेत भंग, खोटे न बोलणे आणि आम्ही काहीच नाही तरी खूप काही आहोत याचा आव आणणे होय.
श्रद्धाळू देवाला म्हणतो, मेरा हर कदम तेरी राह में हो, देव त्याला म्हणतो तू तो सदाही मेरी निगाह में है । या सुंदर ओळीतून त्यांनी भक्त आणि भगवंताचे नाते सांगितले. ज्यांनी तुकोबाराय, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगाचे वाचन केले त्यांनाच प्रीत या शब्दाचा अर्थ कळला, असे मोरारी बापू यांनी सांगितले.
निसर्गाची हानी करू नका
एका गोरक्षकाला त्याच्या गुरुने शंभर गाई दिल्या आणि त्याच्या हजार करण्यास सांगितले. तो गाई हजार होईपर्यंत जंगलातच थांबला आणि सोळा-सतरा वर्षांनी जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या चेहर्यावर तेज होते. ते तेज बघून गुरुने विचारले, तुझा चेहरा असा पुल्लंकित का आहे. तेव्हा त्याने सांगितले, की जंगलात मला सर्व काही निसर्गाने शिकवले. त्यामुळे निसर्गाकडून जे घेण्यासारखे आहे तेच घ्यावे आणि जे भरपूर आहे ते घेण्याच्या भानगडीत पडू नये, असा संदेश मोरारी बापूंनी दिला.
आई-वडिलांवर प्रेम करा
मोरारी बापू म्हणाले, की आई-वडिलांवर प्रेम करायला शिका. जर आई-वडिलांवर प्रेम केले तरच वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल. वृद्धाश्रम हे गजरेचे आहेत. परंतु, ते प्रचंड संख्येने नकोत.