जिथे माणुसकी तिथेच अश्रू… गिरीश बापट यांना श्रद्धांजली; पुण्याच्या प्रश्नांबाबत आस्था असणारा नेता हरपल्याची भावना

जिथे माणुसकी तिथेच अश्रू… गिरीश बापट यांना श्रद्धांजली; पुण्याच्या प्रश्नांबाबत आस्था असणारा नेता हरपल्याची भावना
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'खासदार गिरीश बापट किती जगले, यापेक्षा कसे जगले, याला महत्त्व आहे. पुण्याच्या विकासासाठी पक्षभेद विसरून निर्णय घेण्यासाठी आग्रही राहिलेले बापट, निवडणूक संपली की पुन्हा मित्रत्व जपून मनभेद न ठेवता नेहमी सकारात्मक राहणारा माणूस,' असे बापट यांच्या मित्रत्वाचे किस्से सांगताना अनेकांना कंठ दाटून आला, तर काहींना अश्रूंना आवर घालता आला नाही. पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात अतीव आस्था असणारा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणाशी समरस झालेला राजकारणी हरपला, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली.

बापट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा रविवारी (दि. 16) पुण्यात आयोजिण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रासपचे महादेव जानकर तसेच सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

पवार म्हणाले, 'नागरी प्रश्नांसाठी पक्षीय मतभेद सोडून एकत्र येण्याचे काम पुणे महापालिकेत गिरीश बापट आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. बापट यांनी राजकारणापलीकडे मैत्री जपली. त्यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. पण, स्वत:च्या पक्षाच्या तत्त्वाशी त्यांनी तडजोड केली नाही. पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांना अतीव आस्था होती. संसदेमधील कर्मचार्‍यांसाठी ते पुण्याहून बाकरवडी घेऊन येत होते. बापट यांचे या कर्मचार्‍यांशी चांगले संबंध होते.'

गडकरी म्हणाले, 'सर्वस्पर्शी भावविचाराने दिवंगत गिरीश बापट सर्वांचेच काम करायचे. म्हणूनच ते आपल्यात नाही, हे मन मान्य करीत नाही. वास्तविक पाहता बापट किती जगले, यापेक्षा कसे जगले, हे पुणेकरांना नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांच्या चांगुलपणाच्या गोष्टी प्रत्येकाने आत्मसात कराव्यात. सर्व प्रकारच्या लोकांसोबत बापट यांचे संबंध होते. अनेक कार्यकर्त्यांवर प्रेम केले, मदतीला धावून गेले. सर्व समावेशकता असल्याने प्रत्येकाला हवे हवे असे वाटणारे बापट होते.'

आठवले म्हणाले, 'बापट हे अत्यंत मनमिळाऊ माणूस. कधी त्यांनी जात मानली नाही. पक्ष वेगळे असले तरी नीतिमत्ता जपत सर्वांची कामे केली. बापट यांनी सर्व मित्रांशी दोस्ती ठेवली. दुसर्‍यांना अडीअडचणीमध्ये मदत करणारा, मंत्रिपदाची हवा डोक्यात नसणारा माणूस. बापट यांच्या आठवणी कायम मनात राहतील.' चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मला राजकीय जीवनात प्रस्थापित करण्यासाठी बापट यांनी मेहनत घेतली. कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता आता होणे शक्य नाही.'

अंकुश काकडे, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी यांनीही श्रद्धांजली वाहिली. गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news