खेड : पावसात मासेमारी करण्यासाठी गेल्यावर अंगावर वीज पडून ठाकर समाजातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण परिसरात पाईटच्या रौंधळवाडी गावात घडली. मयत युवक चासकमान धरण परिसरातील वेताळे गावचा आहे. संतोष गुलाब खंडवे (वय २५, रा. वेताळे, ता. खेड) असे मृत युवकाचे नाव आहे.
मयत युवक आणि त्याचे पाच मित्र भामा आसखेड धरणाच्या परिसरातील रौंधळवाडी (पाईट, ता. खेड) येथे सोमवारी (दि २६) मासेमारी करत होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्यावर वीज कोसळली. संतोषच्या अंगावरील कपडे आणि मोबाईल जळून खाक झाले, तसेच त्याच्या उजव्या बाजूचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले. संतोषला त्याच्या मित्रांनी तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तेथुन पुढील कार्यवाहीसाठी त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळी पाईट मंडल अधिकारी एम. एस. सुतार, ग्राममहसूल अधिकारी एम. जी. क्षीरसागर, ग्रामपंचायत अधिकारी ए. एन. फुलपगर, माजी उपसरपंच जयसिंग दरेकर, दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले आदी उपस्थित होते. सर्वांनी मदत करून तात्काळ पंचनामा केला. या घटनेनंतर माजी उपसरपंच जयसिंग दरेकर यांनी मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच पाईट परिसरात किमान पाच किलोमीटरपर्यंत रेंज असलेले वीज प्रतिबंधक टॉवर उभारण्याची मागणी केली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले.