

पुणे : आदिवासींची कला ही निसर्गातून लाभलेल्या लयीतून निर्माण झालेली कलानिर्मिती आहे. आदिवासी समाजातील सर्जनशीलतेला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत तामिळनाडूतील आदिवासी संघाचे अध्यक्ष पी. मणी यांनी व्यक्त केले.
सुंबरान आर्ट फाउंडेशनतर्फे सुंबा कला महोत्सव 2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हा कला महोत्सव दिवंगत ज्येष्ठ चित्रकार प्रा. रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, उद्योजक विनय फडणीस, चैत्रा क्रिएशन्सच्या संस्थापिका आणि स्व. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या कन्या चित्रा मेटे, आदिवासींच्या संस्कृती-कलाविष्काराचे अभ्यासक आणि छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे, त्यांच्या पत्नी पूर्वा परांजपे आदी उपस्थित होते.
या वेळी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आसाम, मेघालय, तामिळनाडू, ओडिशा आणि महाराष्ट्रातील आदिवासी कलावंतांना गौरविण्यात आले. या महोत्सवात सुंबा बाजार, सुंबा सभा, सुंबा सन्मान असे विविध उपक्रम होणार आहेत.
महोत्सवापूर्वी स्व. प्रा. रावसाहेब गुरव यांच्या शिल्पाचे अनावरण त्यांच्या सुंबरान स्टुडिओमध्ये करण्यात आले. डॉ. गौरी दामले यांनी सूत्रसंचालन केले. हा महोत्सव सोमवारपर्यंत (दि. २२ डिसेंबर) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत पाहायला मिळणार आहे.