

Pune Rain News
पुणे : शहरात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पाच ठिकाणी झाडे कोसळली. शनिवार पेठ, उंड्री, लोहगाव, येरवडा, बिबवेवाडी परिसरात या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी साचले. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाला. वसाहतीत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील अधिकार्यांनी दिली. पावसामुळे जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता, हडपसर रस्ता, नगर रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाला. मात्र, शहरात कोठेही वाहतूक विस्कळीत झाली नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.