बारामतीत पाण्याअभावी जळाली प्रशासकीय भवनातील झाडे

बारामतीत पाण्याअभावी जळाली प्रशासकीय भवनातील झाडे

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामतीत सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली यावीत, या उद्देशाने भव्यदिव्य प्रशासकीय भवनाची उभारणी करण्यात आली. परिसर विविध प्रकारची झाडे लावून सुशोभित करण्यात आला. परंतु, सध्या येथील झाडे पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. येथील प्रशासकीय भवन परिसरात शेकडो झाडे लावण्यात आली आहेत.

कित्येक दिवसांपासून झाडांची काळजी घेतली जात नसल्याने काही झाडे सुकून अखेरच्या घटका मोजत आहेत. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा 'बारामती पॅटर्न' राज्यात प्रसिध्द असताना या ठिकाणी मात्र झाडांची काळजी घेतली जात नसल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात यावर्षी उन्हाचा भयंकर तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. उन्हामुळे झाडांवरही परिणाम होत असून, पाणी तसेच अन्य कारणांमुळे झाडे जळून जात आहेत.

प्रशासकीय भवनमधील कोणत्याही विभागाने याकडे लक्ष दिले नसल्याने ही झाडे जळून गेली आहेत, असा आरोप या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी केला आहे. बारामती शहरात मागील दहा वर्षांत विविध कार्यालये उभी राहिली. नव्यानेच उभारण्यात आलेल्या सर्वच कार्यालय परिसरात विविध प्रकारची झाडे लावली जातात. मात्र, कालांतराने या झाडांची देखभाल न केल्यामुळे झाडे जळून जाण्याच्या घटना घडत आहेत. येथील झाडांना पाणी देऊन त्यांची निगा राखावी, अशी मागणी बारामतीकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news