

Transfers in land record department
पुणे : भूमी अभिलेख विभागातील वर्ग तीन आणि चार कर्मचा-याच्या बदल्या या समुपदेशनाद्वारे करण्यात येणार आहेत. तसेच समुपदेशन प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे. त्याची प्रत जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांना सादर करावी व समुपदेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी बदली आदेश देण्यात यावेत, असे आदेश जामाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी विभागातील सर्व उपसंचालकांना दिले आहेत. दरम्यान, समुपदेशनाशिवाय राबविण्यात आलेली बदली प्रक्रिया ही अनियमितता समजण्यात येईल, तसेच संबंधितांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही जमाबंदी आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
महसूल व वन विभागामधील शासन अधिसूचना क्र. आस्था- 2015/680/प्र. क्र. 129/ ई-6, दिनांक 03/03/2020 नुसार गट क व ड या संवर्गातील कर्मचार्यांच्या महसुली विभागांतर्गत बदली करण्यासाठी विभागाचे उपसंचालक (भूमी अभिलेख ) यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वर्ग 3 कमचार्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण विभाग असल्याने त्यांची बदली विभागातील कोणत्याही जिल्ह्यात किंवा कार्यालयात होवू शकते.
तथापि, उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडून करण्यात येणार्या बदली प्रक्रियेत अनियमितता, विकल्पात नमूद पद रिक्त ठेवून अन्य ठिकाणी बदली, ठराविक कर्मचार्यांना एकाच मुख्यालयात नियुक्ती, अशा प्रकारचे तक्रार अर्ज जमाबंदी आयुक्त कार्यालयास प्राप्त होत असतात. तसेच सर्व प्रादेशिक उपसंचालक यांच्याकडून वेगवेगळी कार्यपद्धती अवलंबली जाते. बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाखल होणार्या अर्जामध्ये देखील प्रामुख्याने हे मुद्दे नमूद असतात. हे मुद्दे विचारत घेता सर्व प्रादेशिक उपसंचालक यांच्या स्तरावीरल बदली प्रक्रिया अधिक पारदर्शीपणे पार पडण्यासाठी व यामध्ये एकसूत्रीपणा असावा, यासाठी जमाबंदी आयुक्तांनी काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
त्यानुसार रिक्त पदांची यादी, बदलीपात्र कर्मचार्यांची यादी प्रसिद्ध करून विकल्प घेणे, विकल्पासोबत विरवरणपत्र-2 मधील प्राधान्यक्रमानुसार याद्या तयार कराव्यात. तसेच उपसंचालक स्तरावरील नागरी सेवा मंडळाने शिफारसी नोंदवून त्या उपसंचालकांकडे सादर कराव्यात, नागरी सेवा मंडळाने त्यांच्या शिफारसी संक्षिप्त स्वरूपात न नोंदविता स्वयंस्पष्ट शिफारसी नोंदवाव्यात. नागरी सेवा मंडळाने बदलीबाबत शिफारसी करताना दि. 09/04/2018 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट-1 चा मुद्द (अ) मधील टप्पा क्र. 1 ते टप्पा क्र. 5 मधील कार्यपद्धती अवलंबून संपूर्ण बदली प्रक्रिया पार पाडावी.
नागरी सेवा मंडळाकडील शिफारसी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक भूमी अभिलेख यांनी संवर्गनिहाय कर्मचार्यांना समक्ष समुपदेशनासाठी बोलवावे व प्राधान्यक्रमानुसार तयार केलेल्या यादीप्रमाणे कर्मचार्यांना ज्येष्ठतेनुसार रिक्त पदे दाखवून अंतिम विकल्प द्यावत त्यानुसार बदली प्रक्रिया पार राबविण्यात यावी. बदलीबाबत कर्मचार्यांचे कार्यरत असणारे मुख्यालय विचारात घेवून मुख्यालयाबाहेरील कार्यालयात बदली करावी, असेही जमाबंदी आयुक्तांनी 8 मे रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
समुपदेशनाशिवाय राबवलेली बदली प्रक्रिया ही गंभीर स्वरूपाची अनियमितता समजण्यात येईल व संबंधित अधिका-यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. या सूचनांचे अवलोकन करून आपल्या अधिनस्त विभागातील गट क व गट ड संवर्गातील कर्मचार्यांच्या बाबतीमधील सन 2025 मधील बदली प्रक्रिया महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005, सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 09/04/2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी, तसेच प्रचलीत शासन निर्णयांचे काटेकोरपणे पालन करून पारदर्शीपणे बदली प्रक्रिया पार पाडावी, असेही जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सुहास दिवसे यांनी 8 मे रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.