

पुणे: पुणे जिल्हा परिषदेने कार्यालयीन कामकाजात विविध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. यासाठी कार्यालयीन सेवांचे अद्ययावतीकरण, अभिलेखे आणि नस्ती व वस्तूंचे नोंदणीकरण, ग्रामपंचायत कर आकारणी व वसुलीसाठी डिजिटल माध्यमांचा वापर अशा विविध कामांमध्ये सुलभता आली आहे.
त्याचबरोबर कर्मचार्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणे, सायबर सुरक्षा, नवीन संकेतस्थळ निर्मिती, सिस्टीम ऑफ पेन्शन इलुस्ट्रेशन इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम आदी बाबींना चालना दिली आहे. (latest pune news)
जिल्हा परिषदेचे नवे सीईओ गजाजन पाटील यांनी डिजिटायजेशनचे प्रकल्प हाती घेतले असून, त्यांच्या पॅटर्नची आता जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. कामामध्ये जास्तीत जास्त सुलभता आणण्यासाठी हे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी ’पुढारी’शी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषदेची पूर्वीची वेबसाईट खासगी सर्व्हरवर कार्यरत होते. नवी प्रणाली राबवून ही वेबसाइट एन.आय. सी. ला (नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टिम) जोडली गेली आहे. त्यामुळे वेबसाईट युजरफ्रेंडली झाली आहे.
माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या सर्व कामांची दखल घेऊन शासनाकडून ’शंभर दिवस कार्यक्रम’ उपक्रमाअंतर्गत पारितोषिक देऊन पुणे जिल्हा परिषदेचा गौरवही करण्यात आला आहे.
कोणते घडवले बदल?
योजनांची माहिती डिजिटल स्क्रीनवर : जिल्हा परिषदेकडून नागरिकांसाठी ज्या योजना राबवण्यात येत आहेत, त्या योजनांची माहिती डिजीटल स्क्रीनवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे गरजू लाभार्थींपर्यंत योजना पोहोचू लागली आहे.
ई-ऑफीस प्रणालीचा वापर : कार्यालयीन कामकाजामधील सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या ई ऑफिसमधून आजअखेर 4 हजार 246 नस्ती तयार केल्या आहेत.
ए.आय सेवाविषयक प्रशिक्षण : जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचार्यांना ए. आय,सेवाविषयक व न्यायालयीन बाबींचे प्रशिक्षण दिले. या सर्व बाबींमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ हा नव्याने सेवेत प्रविष्ठ झालेल्या 320 अधिकारी व कर्मचारी, 362 न्यायालयीन प्रकरणांमध्ये 321 प्रकरणांची प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यासाठी झाला आहे. शिवाय 1 हजार 500 कर्मचार्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता वापराबाबतचे प्रशिक्षण दिले गेले आहे. कार्यालयातील कामकाज सोपे होण्यासाठी चॅट जीपीटीसारख्या ए. आय. टूल्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. प्रतीक्षालय व्यवस्था निर्माण करणे.
‘इंटेलिजेंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ‘इंटेलिजेंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू केली असून, यामुळे प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, निविदा मसुदा, कार्यारंभ आदेश व देयके आदी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहेत. यामुळे वेळेची बचत, पारदर्शकता व अभिलेख व्यवस्थापन सुलभ झाले आहे.
आतापर्यंत 3,804 बाबी या प्रणालीद्वारे पूर्ण केल्या आहेत.निवृत्तीवेतनाच्या प्रस्तावांसाठी देखील ही प्रणाली प्रभावी ठरली आहे. 26 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या या प्रणालीद्वारे आतापर्यंत 26 कर्मचार्यांचे निवृत्तीवेतन आदेश मंजूर केले आहेत. यामुळे अचूक गणना, वेगवान मंजुरी व तक्रारी दूर होत असल्याचे दिसून येत आहे.
कर व्यवस्थापनातही डिजीटल झेप
ग्रामपंचायतीच्या कर व्यवस्थापनातही डिजीटल झेप घेण्यात आली आहे. भोर तालुक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायतीने मिळकतींसाठी कोडवर आधारित डिजीटल प्लेट सादर केली असून, याद्वारे नागरिकांना कर माहिती व ऑनलाईन पद्धतीने भरणा शक्य झाला आहे. यामुळे कर संकलनात वाढ झाली आहे.
जिल्हा परिषदेने विविध विभागामध्ये डिजिटायझेशन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. कमीत कमी वेळात नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी हे उपक्रम हाती घेतले आहे. सर्वांच्या सहभागातून प्रशासन नागरिकांपर्यंत सहज पोहचविण्यासाठी हा प्रयत्न आहे.
- गजानन पाटील, जिल्हा परिषद कार्यकारी मुख्यधिकारी पुणे