

निरा(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील प्रवाशांची वर्दळ असलेल्या निरा रेल्वे स्थानकात पुणे, मुंबई, गोंदियाकडे जाणार्या गाड्या प्लॅटफॉर्म नसलेल्या ट्रॅकवर थांबतात. परिणामी, वृद्धांसह महिला व लहान मुलांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानक प्रशासनाच्या विचित्र कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. निरा येथील रेल्वे स्थानकात पुणे, मुंबई, गोंदिया, सातारा, कोल्हापूरकडे आवागमन करणार्या प्रवाशांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
कोविडच्या काळात सर्व प्रवासी एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या. त्यानंतर पहाटेची सह्याद्री एक्स्प्रेस कायमस्वरूपी बंद केली. दिवसभरात फक्त कोयना एक्स्प्रेस हीच गाडी असल्याने व आता गेल्या काही दिवसांपासून पॅसेंजरही बंद असल्याने निरा स्थानकावरून पुणे व मुंबईला जाणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा चालू करावी व महालक्ष्मी एक्स्प्रेसला निरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. तसेच कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून जोरदार होत आहे.
कोविडनंतर कोयना एक्स्प्रेस सुरू झाली असली, तरी जनरल डब्यांची संख्या कमी आहे. परिणामी लोणंद, निरा, जेजुरी स्थानकांवरून पुण्याला जाणार्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. जनरलचा फक्त एकच डबा असल्याने गाडीत मोठी गर्दी होते. प्रवाशांना जीव
धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येत आहे.
आठवडाखेर, सणासुदीला व यात्रा-जत्राकाळात तर कोयना एक्स्प्रेसला तोबा गर्दी होत असते. महिनाभरापूर्वी आरक्षण केले तरी टिकीट वेटिंगचेच मिळते. कोविडपूर्वी कोयना एक्स्प्रेसला सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनरल चार, आरक्षित स्लीपर एक, आरक्षित सेकंड क्लास चार व आरक्षित एसी कोच दोन, असे डब्बे होते. आता नव्याने बदल करीत आरक्षित स्लीपर चार, आरक्षित सेकंड क्लास चार, आरक्षित एसी तीन व एकच जनरल कोच असल्याने पासधारक व ऐनवेळी प्रवास करणार्यांचे हाल होत आहेत.
प्रवाशांच्या गैरसोईकडे कधी लक्ष देणार?
निरा रेल्वे स्थानकावर गोवा, महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत सातत्याने अन्याय होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. तसेच, आता रेल्वेच्या दुहेरीकरणानंतर प्रवासी गाड्या वाढून प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्याउलट पुणे, मुंबईकडे जाणार्या रेल्वेगाड्या मुख्य प्लॅटफॉर्मवर न थांबविता प्लॅटफॉर्म नसलेल्या तसेच पिण्याचे पाणी, लाईट, या सुविधा नसलेल्या रेल्वेलाइनवर थांबविल्यामुळे प्रवाशांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे.
कोयना एक्स्प्रेसला जनरल डबे वाढवा
कोल्हापूर-मुंबई या कोयना एक्स्प्रेसचे जनरल डबे कमी करून त्या जागी स्लीपर क्लास केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एक्स्प्रेसचे डबे पूर्वीप्रमाणे करावेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसला निरा स्थानकावर त्वरित थांबा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.