शहराची शोकांतिका ! जिथं जीव गेले तिथंच पुन्हा होर्डिंग, अजून किती बळीची वाट पाहणार?

शहराची शोकांतिका ! जिथं जीव गेले तिथंच पुन्हा होर्डिंग, अजून किती बळीची वाट पाहणार?

पुणे : होर्डिंग कोसळून एखादी दुर्घटना घडली की महापालिका प्रशासन जागे होते. पाहणी, सर्वेक्षण आणि कारवाईचा बडगा उगारला जाते. काही दिवसांनी मात्र पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते. ही शोकांतिका म्हणावे की पुणेकरांचे दुर्देव. पण नियमांना तिलांजली देऊन अनेक धोकादायक होर्डिंगला महापालिकेनेच बेधडक परवानगी दिली आहे. त्यामुळं जिथं होर्डिंग कोसळून जीवं गेले. तिथचं पुन्हा हे मृत्यूचे सापळे उभे राहिले आहेत. यावर कारवाई करण्या ऐवजी राजकीय वरदहस्त मिळवून आणि अधिकार्‍यांशी साटेलोटे करून बेकायदा होर्डिंगच्या माध्यमातून लाखोंचा मलिदा लाटला जात आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी रात्री महाकाय होर्डिंग कोसळून 14 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक होर्डिग कोसळून निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. या दुर्घटनेनंतरही प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे जागोजागी उभारलेल्या मृ्त्यूच्या सापळ्यावरून दिसत आहे. महापालिका हद्दीत होर्डिंग आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून सशुक्ल परवानगी दिली जाते. परवानगी देण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन होर्डिंगच्या मालकाने करणे गरजेचे आहे. नियमांत बसणार्‍या होर्डिंगला महापालिकेकडून नंबर दिला जातो.

अशा अधिकृत होर्डिंगला नंबर व एजन्सीचे नाव असलेला पिवळ्या रंगाचा लहान नामफलक लावला जातो. अशा होर्डिंग परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेची परवानगी न घेताच अनधिकृतपणे होर्डिंग उभारले जातात. अशा अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेकडून कारवाई केली जाते, ती होर्डिंग जमीनदोस्त झाल्यानंतर मात्र, अनेकवेळा राजकीय वरदहस्त आणि अधिकार्‍यांशी साटेलोटे यांमुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नाही. अशा अनधिकृत होर्डिंगच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवले जात असताना महापालिकेचे मात्र आर्थिक नुकसान होते.

म्हणे, शहरात केवळ 85 अनधिकृत होर्डिंग

महापालिकेने सार आयटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील होर्डिंगचा सर्वे करून घेतला होता. यामध्ये 1800 अनधिकृत होर्डिंग आढळून आले. वर्षभरात दीड हजार अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात आले. तर, अडीचशे अनधिकृत होर्डिंग दंड भरून नियमित करण्यात आले असून, महापालिका हद्दीत केवळ 85 अनधिकृत होर्डिंग असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. अनधिकृत होर्डिंगमध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावात 84, तर औंधमध्ये 1 होर्डिंग आहे.

शहरात अधिकृत होर्डिंग 2598 असून, त्यापैकी 2559 होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल महापालिकेकडे आले आहेत. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीत एकही अनधिकृत होर्डिंग शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आणि ज्या होर्डिंगचा स्ट्रक्चरल अहवाल आला नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाला दिले आहेत. अनधिकृत होर्डिंग आढळल्यास संबंधित परिमंडळाच्या उपआयुक्तांवर कारवाई करण्यात येईल. वादळी वार्‍याचे दिवस असल्याने धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्यासाठी नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर संबंधित होर्डिंगमालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. –

डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.

रेल्वे प्रशासनापुढे महापालिका हतबल

महापालिका हद्दीत रेल्वे प्रशासनाने आपल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग उभारले आहेत. हे होर्डिंग रस्त्याकडे तोंड करून धोकादायक पद्धतीने व नियमापेक्षा अधिक मोठ्या आकाराचे आहेत. त्यामुळे महापालिकेने वारंवार या होर्डिंगवरून रेल्वे प्रशासनाला नोटीस दिल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या नोटिसांना रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.

धोकादायक होर्डिंग व इमारतींवर कारवाई करा : आ. धंगेकर

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला. अशीच घटना पुण्यातही झाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. होर्डिंगबरोबरच अनेक ठिकाणी दुकानांच्या व मॉलच्या मोठमोठ्या पाट्या धोकादायक पद्धतीने लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यावरही आपण कारवाई करावी आणि त्या सुस्थित लावण्याच्या सूचना कराव्यात. आठवड्यात महाराष्ट्रात पावसाळा सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामे तातडीने होणे गरजेचे आहे. धोकादायक झाडाच्या फांद्या काढून घ्याव्यात, अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दहा दिवसांत कारवाई गुंडाळली!

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात 5 ऑक्टोबर 2018 रोजी लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून निष्पाप 4 नागरिकांचा बळी गेला, तर 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शहरातील होर्डिंगची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रावेत येथे होर्डिंग कोसळून सहा नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतरही पुणे महापालिकेने कारवाई हाती घेतली. मात्र, दोन्ही वेळा काही दिवसांनंतर कारवाई गुंडाळण्यात आली.

शहरातील इमारतींवर लटकताहेत यमदूत

सध्याची शहरातील परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी दोन होर्डिंग एकत्र करून मोठे होर्डिंग तयार केल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींच्या भिंतींना धोकादायक पद्धतीने होर्डिंग लटकत आहेत. याशिवाय रस्त्याच्या, चौकाच्या बाजूलाच असलेल्या इमारतींवर मोठमोठे होर्डिंग उभे आहेत.

नियमांनाही फाटा…

रस्त्याच्या कडेला, पदपथला लागून, दुकानांवर, इमारतींवर अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग उभारण्यात आले आहेत. रस्त्यांच्या कडेला किंवा चौकांमध्ये असलेल्या इमारतींच्या भिंतींना होर्डिंग लटकत्या स्वरूपात आहेत. अशा होर्डिंगला महापालिकेने परवानगी दिलेल्या पिवळ्या पाट्या लावलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेनेच थांबा रेषेपासून 25 मिटर अंतर ठेवण्याच्या नियमाला तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते.

होर्डिंग उभारताना कोणते नियम पाळावेत?
  • रस्ता किंवा चौकाच्या थांबा रेषेपासून 25 मीटर अंतरावर होर्डिंग उभे करावे.
  • होर्डिंगची जास्तीत जास्त साईज 20 बाय 40 असावी.
  • साईजनुसार निश्चित केलेल्या उंचीवर होर्डिंग असावे.
  • दोन होर्डिंगमध्ये किमान एक मिटरचे अंतर असावे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news