वाहतूक पोलिस, मदतनीस लाच घेताना ताब्यात; चाकण औद्योगिक भागात कारवाई

वाहतूक पोलिस, मदतनीस लाच घेताना ताब्यात; चाकण औद्योगिक भागात कारवाई
Published on
Updated on

चाकण; पुढारी वृत्तसेवा: ताब्यात घेतलेल्या मोटारसायकलवर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका वॉर्डनसह पोलिस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वाहतूक पोलिस शिपाई आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय 32) आणि वॉर्डन किशोर भगवान चौगुले (वय 43) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चाकण वाहतूक शाखेतील भ्रष्टाचार यामुळे चव्हाट्यावर आला आहे. चाकण येथील घटनेबाबत माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, चाकण वाहतूक विभागाच्या शिपायाने एका मोटारसायकलस्वाराला वाहतूक नियम तोडल्यामुळे मंगळवारी (दि. 6) संध्याकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान पकडले. वाहतूक पोलिस शिपाई आप्पासाहेब अंबादास जायभाय व त्याच्या मदतनिसाने या मोटारसायकलस्वाराकडून कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली.

त्यामुळे मोटारसायकलस्वाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. तडजोडीनंतर लाचेची रक्कम कमी करून 7 हजार रुपये करण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना वाहतूक पोलिस शिपाई व त्याच्या मदतनिसाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त शीतल घोगरे, पोलिस अंमलदार रियाज शेख, सौरभ महाशब्दे, चंद्रकांत कदम या
पथकाने केली.

चाकण येथे काही वाहतूक पोलिस आणि ट्राफिक वार्डन केवळ सावज शोधण्याचे काम करत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. या कारवाईमुळे या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. चाकण येथील वाहतूक पोलिसांना सतत चौकात होणार्‍या तडजोडीबाबत वरिष्ठांनी समज देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news