पुण्यातील सूस रोडवर वाहतूक कोंडी; विकासकामे अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त

पुण्यातील सूस रोडवर वाहतूक कोंडी; विकासकामे अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त

बाणेर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पाषाण परिसरातील सूस रोडवरील विविध अडचणींमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सध्या या रस्त्यावर सुरू असलेली विकासकामे व बालाजी चौकातील वाहतुकीचे नियोजन बिघडल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अर्धवट असलेल्या कामांचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. सूस रोडवरील बालाजी मंदिर चौकामध्ये कायमच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काही महिन्यांपूर्वी येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बालाजी चौक सर्कलला पाषाणकडून बाणेरकडे जाणारी वाहतूक बंद करून पुढील चौकातून वळवण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली होती. परंतु सर्कलवरून पुन्हा बाणेरकडे जाणारी वाहतूक सुरू केल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

सूस रोडवर सायकल ट्रॅक, पदपथ सुशोभीकरण, जलवाहिन्या व ड्रेनेज लाईन आदी कामे सुरू आहेत. परंतु गेले दोन महिन्यांपासून ही कामे बंद आहेत. या कामांचा राडाराडा रस्त्यावर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या पदपथांवर पथारी व्यावसायिक आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

राडारोडा उचलण्याची मागणी

बालाजी चौकामध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पूर्वीप्रमाणे बॅरिकेड्स लावल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. विविध विकासकामांचा राडाराडा रस्त्याच्या कडेला पडून आहे, तो लवकर उचलण्यात यावा व परिसरातील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी कोथरूड विधानसभा युवा मोर्चाचे सरचिटणीस रोहन कोकाटे यांनी निवेदनाद्वारे महापालिकेला व वाहतूक विभागाकडे केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news