

आळेफाटा: पुणे नाशिक महामार्गावर जिल्ह्याचे सरहद्दीवरील आळेखिंड परिसरात सुरू असलेले सिमेंट काँक्रिटीकरण तसेच अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक आळेफाटा मार्गे वळविल्याने प्रचंड वहातूक कोंडी झाली आहे. शनिवारी (दि २७) रात्री नऊ नंतर झालेली वाहतुकीची रविवारी (दि २८) ही कायम आहे.
आळेखिंड परिसरात आठवड्यात पुन्हा तिसऱ्यांदा ही वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवारी रात्रीपासून झालेल्या या वाहतूक कोंडीने आळेफाटा, आळेखिंड व शेजारील बोटा (ता. संगमनेर) या परिसरात सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र आज रविवारी बारा वाजेपर्यंत दिसून येत आहे. (Latest Pune News)
सध्या आळेखिंड परिसरात नाशिक बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असल्याने वाहतूक एका बाजूने सुरु आहे त्यातच अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील वाहनांची वळवलेली वाहतूक यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.
यापूर्वीही रविवार (दि 14) गुरुवार (दि 25) वाहतूक कोंडी झाली होती तर पुन्हा आज रविवारी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या महामार्गावर ठिकठिकाणी अवजड वाहने बंद पडल्याचा फटकाही या वाहतुक कोंडीला बसला असल्याचे आळेफाटा पोलिसांकडून सांगण्यात आले.
आळेफाटा पोलिस, संगमनेर महामार्ग पोलिस, घारगाव पोलिस राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे कारवाई करून ही वाहतूक सुरळीत करत आहेत. नेहमी होणारी वाहतूक लक्षात घेऊन तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सध्या जोर पकडू लागली आहे.