

पुणे: ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता... नमस्तयै नमस्तयै नमो नम:...’ या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरूप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्या वेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा वेगळा होता. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या.
महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात हुजूरपागा लक्ष्मी रस्ता आणि रेणुका स्वरूप शाळेतील 125 मुलींचे कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. कन्यापूजनानंतर ट्रस्टतर्फे सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देखील देण्यात आल्या. सुगंधित अत्तरपाणी मुलींवर शिंपडून त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले. (Latest Pune News)
अमिता अग्रवाल म्हणाल्या की, शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणाऱ्या मातांची रूपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींंमध्ये ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. खूप शिकून मोठे व्हायला हवे, तरच देवी प्रसन्न होईल.
प्रवीण चोरबेले म्हणाले की, समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला जसे की पानशेत, खडकवासला धरणावर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. अनेक मुली या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच मंदिरात आल्या होत्या. उपस्थित सर्वांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.