

पुणे: महापालिकेच्या मिळकतकरातील सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्क्यांची सवलतीची मुदत आज सोमवारी (दि. 30) संपत आहे. त्यामुळे ही सवलत मिळण्याची आज अखेरची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
नागरिकांनी वेळेत मिळकतकराचा भरणा करावा, यासाठी महापालिकेकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोन महिने सर्वसाधारण करात सवलत देण्याची योजना राबविते. त्यानुसार 25 हजारांपर्यंत सर्वसाधारण कराची रक्कम असलेल्या करदात्यांना 10 टक्के, तर त्यापेक्षा अधिक रक्कम असलेल्यांना 5 टक्के सवलत दिली जाते. (Latest Pune News)
यावर्षी मिळकतकराची बिले एप्रिलऐवजी मे महिन्यात वाटण्यात आली होती. त्यामुळे सवलतीची योजना 30 जून करण्यात आली होती. त्यानुसार आज सोमवारी ही मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे मिळकतकरधारकांनी या आज सवलतीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळतकतकर विभागप्रमुख अविनाश संपकाळ यांनी केले आहे.
...तर दोन टक्के दंडाची शास्ती
थकीत मिळकतकरावर दोन टक्के प्रतिमहिना दंडाची शास्ती आकारली जाते. त्यामुळे ज्यांनी अद्याप करभरणा केलेला नाही. त्यांना 1 जुलैपासून हा दंड लागू होणार आहे. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकतकरातून तीन हजार 200 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेकडून मे महिन्यात 14 लाख 70 हजार मिळकतकर धारकांना बिलांचे वाटप करून करवसुली सुरू केली आहे.