[author title="सुनील माळी" image="http://"][/author]
स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगल्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्यात सत्तेत सहभागी होणारे अनेक राजकारणी आपण पाहिले, पण स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीने सत्ताधारी काँग्रेसला विरोध करणारे आणि पुढे आणीबाणीनंतर विरोधकांच्या हाती सत्ता आल्यावरही सत्तेपासून कटाक्षाने दूर राहणारे एस. एम.सारखा नेता विरळाच. आधी स्वातंत्र्यासाठी आणि ते मिळाल्यावर, तसेच स्वत: लोकसभेत गेल्यावरही सामान्य माणसासाठी-कामगारांसाठी कायम आंदोलन-संघर्षच करत राहणारा खासदार पुण्याला मिळाला होता.
एस. एम. जोशींचा जन्म 1904 मधील पुणे जिल्ह्यातील जुन्नरचा. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जवळील गोळप होय. 1915 मध्ये वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले. शिकत असतानाच त्यांना राष्ट्रभक्तीची आस लागली. त्यातूनच चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. पुण्यात विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. पर्वतीचे मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे, यासाठीच्या आंदोलनात नानासाहेब गोरे यांच्याबरोबरच एस. एम. यांनीही भाग घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला हजारो सनातनी आले होते. पर्वती सत्याग्रहानंतर सनातन्यांनी सत्याग्रहाला विरोध म्हणून सभाही घेतली. त्या प्रचंड सभेचा रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला.
स्वातंत्र्यलढ्यातील सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे एस. एम. यांना इतर नेत्यांबरोबरच तुरुंगात ठेवण्यात आले. या तुरुंगवासात इतर नेत्यांकडून त्यांना मार्क्सवाद आणि समाजवाद या संकल्पनांचा परिचय झाला. त्यामुळेच नंतरच्या काळात काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या स्थापनेत ते सक्रिय होते. देशात आणि मुख्यत: महाराष्ट्रात समाजवादी विचाराचा प्रसार करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. समाजवादी चळवळ म्हटले की एस. एम. यांच्याकडे बोट दाखवले जाई, एवढे ते त्या कामात बुडून गेले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यास 1960 पर्यंत वाट पाहावी लागली. तोपर्यंतच्या काळात महाराष्ट्र हे मुंबई राज्याचा भाग होते. त्या मुंबई प्रांताचे आमदार म्हणून एस. एम. यांनी काम केले.
लोकसभेच्या 1967 च्या निवडणुकीत त्यांची सरळ लढत झाली ती काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गाडगीळ यांच्याशी. मात्र, त्यांना आपल्या विजयाचा आत्मविश्वास होता. अण्णा म्हणजेच एस. एम. यांनी त्यांच्या 'मी एस. एम.' या आत्मचरित्रात नमूद केले आहे, "… मी संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या तिकिटावर पुण्यातून लोकसभेच्या जागेसाठी उभा होतो. नानासाहेब (गोरे) त्याच जागेसाठी उभे राहू इच्छित होते. निवडून येण्याची शक्यता जास्त प्रमाणात मला होती. कारण संपूर्ण महाराष्ट्र समितीचा आणि संसोपाचा पाठिंबा मला असल्याने ब्राह्मणेतरांची बरीच मते या वेळी माझ्यामागे होती."
65 सालच्या जातीय दंग्यातील कामगिरीमुळे पुष्कळसे मुसलमानही मला अनुकूल होते. त्यामुळे संसोपाच्या मंडळींचे, संपूर्ण महाराष्ट्र समितीतील मित्रांचे आणि खुद्द माझेही मत असे होते की, ही जागा नानासाहेबांनी लढवली तरी त्यांना यशाची शक्यता नाही… मी उभा राहिलो आणि विठ्ठलराव गाडगीळ यांच्यापेक्षा 13 हजार 535 मते जास्त मिळवून निवडूनही आलो." अगदी खासदार नव्हते तेव्हाही आणि झाल्यानंतरही एस. एम.नी एका घटकाकडे आत्मीयतेने लक्ष पुरवले आणि ते म्हणजे कामगारवर्गाकडे. अगदी 1934 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर संरक्षण साहित्याची निर्मिती करणार्या कामगारांचे संघटन केले, बँक कामगारांची संघटना केली. वेगवेगळ्या कामगारवर्गाला त्यांनी पाठिंबा दिला, वेळप्रसंगी उपोषण केले. काही संघटनांचे ते अध्यक्ष झाले, तर काहींचे सरचिटणीस, पण या पदांपेक्षा कामगारांना न्याय मिळावा, ही कळकळ त्यामागे होती. खासदार झाल्यानंतर तर ते कामगारवर्गासाठी अधिक सक्रिय झाले.
लेखनाचे अंग हे पुण्याच्या खासदारांपैकी अनेकांचे वैशिष्ट्य होते. एस. एम. त्याला अपवाद नव्हते. पत्रकार आणि लेखक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची नोंद घेतलीच पाहिजे. त्यांनी 'लोकमित्र' दैनिक चालवले. 'मजदूर' साप्ताहिक, 'साधना' या साप्ताहिकांशी त्यांचा निकटचा संबंध होता. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर साने गुरुजींनी उपोषण केले, त्यामुळे त्या वेळी त्यांनी 'कर्तव्य' या सायंदैनिकाचे काम एस. एम. यांच्याकडे दिली. पत्रकारितेतील या कामाप्रमाणेच ललित लेखनातही ते मागे होते. त्यांचा 'ऊर्मी' हा कथासंग्रह 'मी एस. एम.' हे आत्मचरित्र वाचनीय ठरले. 'मी एस. एम.'मध्ये 1920 पासून 1977 पर्यंतच्या कालखंडातील देशाचाच इतिहास आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर पुन्हा अशाच प्रकारे सक्रिय होण्याची वेळ आली ती आणीबाणीमध्ये. आणीबाणीला एस. एम. यांनी विरोध केला, पण त्यानंतर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते सहभागी झाले नाहीत. आणीबाणीच्या काळात ते लोकशाही-समर्थक म्हणून कार्यरत राहिले. जनता पक्षाच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र ते सत्तास्थानापासून निग्रहाने बाजूला राहिले. अत्यंत नम्र, निगर्वी, सर्वांना हवेहवेसे वाटणार्या अशा व्यक्तिमत्त्वाच्या एस. एम. यांची नाळ सामान्य माणसाशी जोडली गेली होती. ती अखेरपर्यंत कायम ठेवली आणि तीच येणार्या खासदारांना मार्गदर्शक ठरली…