पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'गोविंदाची पंढरी' अशी ओळख असलेल्या कसब्यामध्ये दहीहंडीसाठी मानवी मनोर्यांच्या सरावाला वेग आला आहे. दोन आठवड्यांवर दहीहंडीचा सण आल्याने मानवी मनोर्यांचे सात ते आठ थर रचण्यासाठी कसब्यातील संघांमध्ये चढाओढ लागली आहे, तर उपनगरांतही गोविंदा पथकांच्या सरावाच्या तयारीला वेग आला आहे. शहरासह उपनगरांमध्ये महाविद्यालय, नोकरी तसेच घरची जबाबदारी सांभाळत अनेक युवक-युवती रात्री दहानंतर गल्लोगल्ली सरावासाठी एकत्र येऊ लागले आहेत. गणपती बाप्पाचा जयघोष करत एकावर एक थर रचत पाचहून अधिक थर लावण्याचा सराव संघाकडून करण्यात येत आहे. संयम, एकाग्रता आणि एकजुटीच्या जोरावर मानवी थर रचून गोविंदा गोपाळकाल्यासाठी सज्ज होऊ लागल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. यामध्ये केवळ पुरुषच नाही तर महिला संघही आघाडीवर आहेत.
एका संघामध्ये तब्बल शंभर ते दीडशे गोविंदा
एका संघात सुमारे शंभर ते दीडशे गोविंदाचा समावेश असतो. 10-5-3-2-1-1 या स्वरूपात सहा, तर 12-6-4-3-2-1-1 या प्रकारात सात थरांचे मनोरे उभे करून दहीहंडी फोडली जाते. शहर व जिल्ह्यात तीन दिवस दहीहंडीचा सोहळा चालतो. संघांना मिळालेल्या कार्यक्रमांच्या सुपारीनुसार तीन दिवस गोविंदाचे पथक शहर व जिल्ह्यात दहीहंडी फोडतात.
कसबा पेठेत सर्वाधिक संघ
हुतात्मा भगतसिंग मित्रमंडळापासून कसबा पेठेत दहीहंडी संघांना सुरुवात झाली. या मंडळापासून सुरू झालेली दहीहंडीची परंपरा आज राधे कृष्ण ग्रुपपर्यंत येऊन पोहोचली आहे. शहरातील जवळपास 15 ते 20 संघांपैकी 11 स्थानिक संघ एकट्या कसब्यातील आहेत. त्यामध्ये वंदे मातरम् मित्रमंडळ, शिवतेज मित्रमंडळ, नटराज मित्रमंडळ, भोईराज मित्रमंडळ, राधे कृष्ण ग्रुप यांसह मंगळवार पेठेतील भगवा ग्रुप, नवज्योत दहीहंडी उत्सव, संघर्ष दहीहंडी संघ, शिवशक्ती ग्रुप आदी संघांचा समावेश आहे.
हेही वाचा :