पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत ; सिंहगड, राजगडावर झुंबड

पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत ; सिंहगड, राजगडावर झुंबड

खडकवासला: पुढारी वृत्तसेवा :  पावसाळी पर्यटनासाठी रविवारी (दि. 25) सुटीच्या दिवशी सिंहगड, राजगड, तोरणागडासह खडकवासला, पानशेत धरण परिसरात पर्यटकांची झुंबड उडाली होती. दाट धुक्यात हरवून गेलेल्या गडकोटांवर रिमझिम पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद तरुणाईने लुटला. खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे -पानशेत रस्त्यासह सिंहगड घाटरस्ता तसेच त्याला जोडणार्‍या डोणजे,कोंढणपूर- शिवापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीत पर्यटकांसह स्थानिक नागरिक अडकून पडले.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना सकाळपासून रात्रीपर्यंत रस्त्यावर उतरावे लागले. प्रचंड वाहनांमुळे दिवसभर वाहतूक मंदगतीने सुरू होती. सिंहगड घाटरस्त्यावर सकाळी दहापासून दुपारी साडेतीनपर्यंत तीन तेsin चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नांदेड फाटा, किरकटवाडी फाट्यापासून खडकवासला धरण चौपाटी ते डीआयटीपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती.

सिंहगडावर तब्बल पंधरा हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. गडाच्या पुणे, कल्याण दरवाजासह नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसर गजबजून गेला होता. प्रचंड गर्दीमुळे दरवाजातून ये-जा करताना पर्यटकांना थांबावे लागत होते. दिवसभरात सिंहगडावर 664 चारचाकी व 1660 दुचाकी वाहने गेली. वाहनचालक पर्यटकांकडून जवळपास दीड लाख रुपयांचा टोल वनविभागाने वसूल केला.
राजगड किल्ल्यावर दिवसभरात हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. गुंजवणे, पाल दरवाजा मार्ग , बालेकिल्ला, राजसदरेचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. सकाळपासून गड दाट धुक्यात हरवून गेला. रिमझिम पावसाबरोबर अधूनमधून सरी कोसळत होत्या. संततधारेत ओले चिंब भिजत तरुणाईने पावसाळी पर्यटनाचा आनंद साजरा केला. दुर्गम तोरणागडवरही एक हजारावर पर्यटकांनी गर्दी केली होती. गडाच्या पायथ्याचा वेल्हे बुद्रुक येथील वाहनतळ हाऊसफुल झाला होता.

logo
Pudhari News
pudhari.news