Pune : निळकंठेश्वर डोंगरावर पर्यटकांसाठी सुविधा

Pune : निळकंठेश्वर डोंगरावर पर्यटकांसाठी सुविधा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : देशभरात व्यसनमुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या डावजे (ता. मुळशी) डोंगरावरील श्री क्षेत्र निळकंठेश्वर डोंगरावर भाविक, पर्यटकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या साठी आमदार भिमराव तापकीर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत आमदार तापकीर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून जांभली ते डोंगर पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता व इतर कामे करण्यात आली आहेत. देवस्थानच्या वतीने डोंगरावर सामाजिक देखावे, भाविकांसाठी निवासस्थाने, विहीरी, तळी आदी कामे करण्यात आली आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निळकंठेश्वर देवस्थान परिसरात सुशोभीकरण, पर्यटक, भाविकांसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, गार्डन, निवारा शेड, संरक्षण भिंत आदी कामे करण्यात येणार आहेत.

निळकंठेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्याची मागणी निळकंठेश्वर सेवा समितीचे राधेश्याम शर्मा व अ‍ॅड. नरसिंह लगड यांनी केली आहे. मंदिर परिसरात लोकसहभागातून वन औषधी वनस्पती लागवड, वनीकरण अभियान राबविण्यात येत असल्याचे अ‍ॅड. लगड यांनी सांगितले.

बससेवा, रोप-वे, रस्ते व्हावेत
शिवभक्त शंकरराव सर्जेमामा यांनी स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थानची स्थापना केल्यापासून गेल्या 50 वर्षांत लाखो नागरिकांची व्यसनमुक्ती करण्यात आली. सर्जेमामा यांच्या निधनानंतर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब सर्जे यांनी व्यसनमुक्तीचे कार्य सुरू ठेवले आहे. व्यसनमुक्तीची विधायक चळवळ सर्वदूर पोहचण्यासाठी तसेच भाविक व स्थानिकांची गैरसोय दूर होण्यासाठी मोसे नदीवर पूल, सरकारी बससेवा, रोपवे, रस्ते आदी विकासाची गरज आहे, असे राधेश्याम शर्मा यांनी सांगितले.

निळंकठेश्वर देवस्थानला निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभले आहे. विविध सहली, पर्यटक तसेच दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. देवस्थानच्या विकास कामांमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच हवेली, वेल्हे व मुळशी तालुक्यातील भूमिपुत्रांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध होणार आहे.
                                                       -भीमराव तापकीर, आमदार.

धार्मिक कार्यातून व्यसनमुक्तीचे विधायक कार्य गेल्या साठ वर्षांपासून सुरू आहे. उंच डोंगरावर देवस्थान असल्याने अनेक अडचणीवर मात करत भाविक येतात. शासनाने सुविधा उपलब्ध केल्याने भाविकांची, पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.
                              -बाळासाहेब सर्जे, अध्यक्ष, निळकंठेश्वर देवस्थान ट्रस्ट.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news