

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तोरणागडाच्या बिन्नी दरवाजाचे अनेक महिन्यांपासून रखडलेले डागडुजीचे काम पूर्ण होऊन हा मार्ग पर्यटकांना खुला झाला आहे. मात्र, उंच कड्यातील या पायमार्गावर संरक्षक कठडे (रेलिंग) नसल्याने पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. अतिदुर्गम तोरणागडावर जाण्यासाठी वेल्हे मार्गावरील बिन्नी दरवाजाने पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असते.
उंच डोंगरांच्या कडेकपारीतून हा मार्ग आहे. एका बाजूला खोल दर्या आहेत. शंभर ते दीडशे फूट अंतरावर रेलिंग नसल्याने पर्यटकांना निसरड्या कातर खडकातून अक्षरशः जीव मुठीत धरून चढउतार करावी लागत आहे. काही ठिकाणी फक्त दोरखंड लावले आहेत. पावसाळ्यात कातर खडकावरून पाय घसरून पर्यटक दीड-दोन हजार फूट खोल दरीत कोसळण्याचा धोका आहे.
बिन्नी दरवाजाचे काम रेंगाळल्याने साडेचार महिने गड पर्यटनाला बंद होता. बिन्नी दरवाजा मार्ग खुला झाल्याने गडावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. उंच कड्यावरील खडकात बिन्नी दरवाजा आहे. दरवाजाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे. गडाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना पर्यटकांच्या सुरक्षेकडे मात्र पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. गडाच्या डागडुजीसाठी शासनाने साडेचार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बिन्नी दरवाजाचे काम पूर्ण झाले असले तरी बहुतांश कामे अर्धवट आहेत. सध्या म्हसोबा टाके, तोरणाजाई टाके, श्री मेंगाई मंदिर दुरुस्ती आदी कामे सुरू आहेत.
रेलिंगअभावी पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व धोकादायक मार्गांवर लोखंडी रेलिंग बसवाव्यात.
– भगवान पासलकर,संचालक, जिल्हा दूध संघ.
गेल्या आठवड्यातच बिन्नी दरवाजाचे काम पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला आहे. मार्गावर रेलिंग बसविण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी बिन्नी दरवाजा मार्गावरील रेलिंग बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे.
– विलास वाहणे,
सहसंचालक, पुरातत्व विभाग.