नारायणगाव: मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमालीचे घटले असून, अनेक शेतकर्यांना शेतातील पीक फेकून द्यावे लागले आहे.
मात्र, आवक कमी झाल्याने सध्या 22 किलोच्या क्रेटला 500 ते 600 रुपये भाव मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केलेल्या बहुतांश टोमॅटोच्या बागा मे महिन्यातील पावसामुळे पूर्णपणे वाया गेल्या आहेत. (Latest Pune News)
अनेक शेतकर्यांना अर्ध्याहून अधिक टोमॅटो शेतातच सोडून द्यावे लागले. यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाढलेल्या भावाने काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी झालेल्या नुकसानीची भरपाई होणे कठीण असल्याचे अनेक शेतकर्यांनी म्हटले आहे.
नारायणगाव येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. मुंबईच्या व्यापार्यांची वाढलेली उपस्थिती आणि कमी आवक यामुळे 22 किलोच्या क्रेटला 200 ते 500 रुपये भाव मिळत आहे.
सकाळी 7 वाजता सुरू होणारे हे मार्केट 10 वाजेपर्यंत टोमॅटोची विक्री पूर्ण करते. संगमनेर, अकोला, पारनेर, बीड, येवला, आंबेगाव, खेड, शिरूर आणि बारामती या तालुक्यांमधूनही शेतकरी नारायणगाव मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीसाठी आणतात, कारण येथे चांगला भाव आणि योग्य सोयीसुविधा मिळतात.
शेतकर्यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केली होती. पण, अचानक आलेल्या पावसाने त्या बागा पूर्ण खराब झाल्या. ज्यांनी एप्रिलमध्ये लागवड केली आहे, त्यांचे टोमॅटो पंधरा दिवसांत सुरू होतील आणि वाढलेले बाजारभाव त्यांना नक्कीच फायद्याचे ठरतील.
-रामदास हांडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, उंब्रज