

नसरापूर: नसरापूर (ता. भोर) येथील श्रीक्षेत्र बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टने सुरू केलेल्या पुरुषांनी शर्ट काढून मंदिरात दर्शन घेण्याच्या पद्धतीमुळे महिलावर्गाची कुचंबणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नसरापूर ग्रामपंचायतीने ट्रस्टचा नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाबाबत ट्रस्ट अनभिज्ञ असून, धर्मदाय आयुक्तांचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगत ग्रामपंचायतीचा निर्णय ट्रस्टने फेटाळला आहे.
श्रीक्षेत्र बनेश्वर महादेव देवस्थान येथे पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेणे हा नियम बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी अर्जाद्वारे हरकत घेतली होती. याबाबत नसरापूर ग्रामपंचायत सभागृहात सरपंच उषा कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत राजेश कदम यांनी ठराव मांडला. त्याला प्रज्योत कदम यांनी अनुमोदन दिले. या वेळी सर्वानुमते नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा ठराव धर्मादाय आयुक्ताकडे पाठविणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली. (Latest Pune News)
मात्र, याबाबत देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल गयावळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी शर्ट काढून दर्शन घेण्याची प्रथा असून, ग्रामपंचायतीने ट्रस्टला विश्वासात न घेता हा निर्णय परस्पर घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांचा जो निर्णय असेल तो ट्रस्टला मान्य असेल, असे ट्रस्टच्या वतीने गयावळ यांनी सांगितले. ही प्रथा कोणत्याच शिवमंदिरामध्ये नाही
गेल्या वर्षापासून मंदिरातील महादेव पिंडीचे दर्शन घेण्याकरिता येणार्या पुरुष भाविकांनी अंगावरील शर्ट काढून पिंडीचे दर्शन घ्यावे, असा नियम बनेश्वर देवस्थान ट्रस्टने सुरू केला आहे. परंतु, एखाद्या पुरुषाच्या अंगावर बनियन नसते किंवा ते फाटलेले असते. त्यामुळे पुरुष भाविकांची कुचंबणा होते.
तसेच महिलाभक्तांच्या मनामध्ये लज्जा/घृणा निर्माण होते. अनेकवेळा भाविकांना दर्शन न घेता परतावे लागत आहे. ही प्रथा भारतामधील कोणत्याच शिवमंदिरामध्ये नाही. याचा दाखला देत सुरू केलेली ही प्रथा बंद करावी. याबाबत ग्रामपंचायतीने सर्वानुमते पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेणे, ही प्रथा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्जामध्ये ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
बनेश्वर देवस्थान हे सर्व भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. मात्र, जाचक नियमामुळे अनेकदा महिलांची कुचंबणा होत असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांच्या हरकतीनुसार सर्वानुमते आधुनिक विचारांना शोभेल असा ठराव केला आहे.
- उषा विक्रम कदम, सरपंच, नसरापूर