

पुणे: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शनिवार (दि.23 ऑगस्ट) ते सोमवार (दि. 8 सप्टेंबर 2025) या कालावधीत मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (रा. म. 48), मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. 66) आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून कोकणात जाणार्या भाविकांना तसेच एसटी बसला टोल माफीची सवलत मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव सचिन चिवटे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ आॉफिस यांच्यामार्फत दिल्या जाणार्या पासेसची संख्या, एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई यांना माहितीकरिता सादर करणाच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. (Latest Pune News)
...या ठिकाणी मिळणार पास
गणेशोत्सव-2025 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे टोल माफी पासवर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद असणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक विभाग, पोलिस स्टेशन, आरटीओ आॉफिस यांनी समन्वय साधून पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस चौकी, आरटीओ आॉफिसमध्ये पासेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.