

कोरेगाव मूळ: हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील जेधे चाळ (इनामदार वस्ती) येथे पत्नीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 18 मे 2025 रोजी घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत उरुळी कांचन पोलिसांनी पत्नीला हिला अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, मृत सूरज दामोदर पवार (रा. वाल्हे वागदरवाडी, ता. पुरंदर) याचे लग्न मयूरीसोबत काही वर्षांपूर्वी झाले होते. सुरुवातीला सहजीवन सुरळीत चालले; मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात सतत वाद होत होते. (Latest Pune News)
मयुरीकडून होत असलेला मानसिक त्रास, सततची भांडणे, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ आणि काहीवेळा शारीरिक धक्काबुक्की यामुळे सूरज मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. अखेर, 18 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याने राहत्या घराच्या बेडरूममध्ये साडी व दोरीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपवले.
पित्याची तक्रार, पोलिसांची कारवाई
या प्रकरणात सूरजचे वडील दामोदर निवृत्ती पवार (वय 60) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर पत्नीवर गुन्हा दाखल केला. बुधवारी (दि. 4) सायंकाळी 5.57 वाजता पत्नीला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मटाले करत असून, मृताच्या कुटुंबीयांचे जबाब, मोबाईलमधील मजकूर, सुसाइड नोट आणि शेजार्यांकडून मिळालेली माहिती यांचा अभ्यास केला जात आहे.
मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये साक्ष
या घटनेनंतर पोलिसांनी तपासादरम्यान मृत सूरजचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यामध्ये एक संदेश अथवा व्हॉईस रेकॉर्ड आढळून आला, ज्यामध्ये ‘माझ्या मृत्यूला माझी पत्नी जबाबदार आहे’, असे स्पष्टपणे नमूद होते. यावरूनच ही आत्महत्या एक मानसिक छळाच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.
घटनेनंतरचे सामाजिक व कौटुंबिक वातावरण
घटनेनंतर कोरेगाव मूळ व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सूरज एक शांत, मनमिळावू आणि कामाला लागलेला तरुण होता, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ देतात. पत्नीच्या छळामुळे इतकी टोकाची पावले उचलावी लागल्याने समाजात स्त्री-पुरुषांमधील वाढत्या तणावांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.