

मंचर: आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतीची कामे रखडली आहेत. ओल्या मातीत सरी फोडून उसाची लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. इतर पिकांची लागवड देखील रखडली आहे. पावसाने उघडीप न दिल्यास लागवड करणे अशक्य होणार आहे.
आंबेगाव तालुक्यात घोडनदी, डिंभे उजवा व डावा कालवा असल्याने तालुक्याची बागायती तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांची संख्या जास्त आहे. (Latest Pune News)
शेतकर्यांचा ऊस भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तसेच जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास जातो. यावर्षी ऊस लागवडीच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, यामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे.
अवकाळी पाऊस काही दिवसांतच थांबेल अशी आशा शेतकर्यांना होती. मात्र, हा पाऊस पावसाळ्यासारखाच बरसला. त्यामुळे सरी काढून त्यामध्ये ऊस लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. अनेक शेतकर्यांची ऊस लागवड पावसाने रखडली आहे. ऊस लागवडीला उशीर झाल्यास तोडणीला देखील उशीर होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होऊ शकते.
शेतकर्यांची बटाटा, फ्लॉवर, कोबी यासह विविध तरकारी पिके काढून जमीन मोकळी केली आहे. मात्र, पावसामुळे शेतीत ओलावा असल्यामुळे मशागत करणे अवघड झाले आहे. सततच्या पावसाने शेतात काम करणार्या मजुरांना रोजगार मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.