

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरगुती वीजमीटर असो किंवा वाणिज्यिक अगर औद्योगिक वीजमीटर, त्यांची तपासणी वारंवार करणे आवश्यक आहे. तसेच वेळच्यावेळी दुरुस्ती केली, तर विद्युत अपघात टाळण्यास मदत होते. याबरोबरच वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आयएसआय प्रमाणित असावे.
10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वायरिंगची तपासणी करून घ्यावी. तसेच सर्व प्लग पॉईंट, हीटर, फ्रिजसाठी अर्थिंग योग्य असल्याबाबतची खबरदारी घेत राहावी. योग्य अर्थिंगमुळे शॉकची तीव्रता कमी होते, तसेच मिक्सर, हीटर, गीझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.
घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्याशेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची वितळतार (फ्यूज) वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.
म्हणजेच या उपकरणांमुळे वीज अपघात टळू शकतो किंवा घरातील महागड्या उपकरणांचे नुकसान होणार नाही. घरात कुठेही 35 मिली अॅम्पियरचे लीकेज असेल, तर ती ट्रीप होते व विजेचा पुरवठा बंद पडतो. लीकेज काढणे किंवा त्याची दुरुस्ती करेपर्यंत विजेचा प्रवाह सुरूच होत नाही. घरात हे योग्य कॅपॅसिटीचे उपकरण बसवून घेतल्यास वीज अपघाताचा धोका कमी होतो.
ओलसर जागा, पाण्याचे नळ, गॅस पाईप यापासून वायरिंग दूर ठेवण्यात यावी. वायरच्या इन्सुलेशनवर ओलसर भागाचा परिणाम होऊन करंट येण्याची शक्यता असते. घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावरांच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.
शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करून नये. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे 1912 किंवा 18002123435 किंवा 18002333435 हे तीन टोल फ्रि क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत.