

कळस; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील बहुप्रतिक्षित कळस-लोणी देवकर मार्गावरील पुलांच्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला. काही पुलांचे काम सुरू झाले आहे. मात्र, काम घाईगडबडीने न करता दर्जेदार करावीत, अशी सूचना स्थानिकांसह वाहनचालक, प्रवाशांनी केली आहे. कळस-लोणी देवकर हा मार्ग पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेला आहे.
हा तालुक्याला जाण्याचा जवळचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, या मार्गावरील कळस, रूई या ठिकाणच्या ओढ्यांवरील अरुंद पुलांमुळे व मोठ्या चढणीमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या ठिकाणी ऊस वाहतूक करणारे अनेक ट्रक व ट्रॅक्टर-ट्रॉलीला अपघात झाले आहेत.
याशिवाय पावसाळ्यात पुराच्या पाण्याने येथील ओढ्यांमध्ये वाहने वाहून जातात. त्यामुळे या ठिकाणच्या पुलाची उंची वाढवावी व चढण कमी करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर काही पुलांचे कामदेखील सुरू झाले आहे. मात्र, ही कामे दर्जेदार करावीत, अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालक, प्रवाशांकडून होत आहे.