पुणे: टिळक रस्त्यावरील गणेशोत्सव मिरवणुकीत पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवणे, दोन गणपती मंडळांत अंतर पडू न देणे आदी सर्व मुद्द्यांबाबत सकारात्मक आणि योग्य निर्णय घेऊन ठोस पावले उचलली जातील आणि अशा उपायांद्वारे ही मिरवणूक वेळेत संपविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पुण्याचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिले.
पोलिसांकडून सापत्न वागणूक; बंदोबस्त ठेवण्याचे आश्वासन फसवे
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीसाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकार्याची नेमणूक करून चोख बंदोबस्त ठेवू, असे आश्वासन दिले जाते. परंतु, ते कधीच पाळले जात नाही, असा आरोप गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय बालगुडे यांनी या वेळी केला. तर, टिळक रस्त्याकडे पोलिसांसह सर्वांकडूनच दुर्लक्ष केले जाते. (Latest Pune News)
मिरवणूक सुरू झाल्यानंतरही येथून दुतर्फा वाहतूक सुरू ठेवली जाते, असे ग्राहकपेठेचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले. मिरवणुकीत ज्याला पुढे जायचे त्याला जाऊ दिले पाहिजे. त्यासाठी मंडळे बाजूला घेण्याची दोन-तीन ठिकाणे आहेत, त्याचा वापर पोलिसांनी केला पाहिजे, अशी सूचना सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते यांनी केली.
प्रत्येक मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा : बालन
गणेशोत्सव मिरवणुकीत पोलिसांनी सर्वच विसर्जन मार्गांवर चोख बंदोबस्त पुरविला पाहिजे, अशीअपेक्षा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन यांनी या वेळी व्यक्त केली.
टिळक रस्त्याबाबत मंडळे म्हणतात...
अभिनव चौकातून होणारी घुसखोरी थांबवावी.
पोलिस मदत कक्षात वरिष्ठ अधिकारी व पुरेसे पोलिसच नसतात.
दोन मंडळांत पडणारे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत.
सायंकाळी लाइटचे गणपती रस्ता अडवतात, इतरांना पुढे जाऊ देत नाहीत.
पुढे जाऊ इच्छिणार्यांना मार्ग करून देण्याची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी.
मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत मंडळे मार्ग अडवून थांबतात, त्यांनाही पुढे रेटण्याचे काम पोलिसांनी करावे.
‘दै. पुढारी गणेशोत्सव व्यासपीठा’द्वारे आयोजित मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनेकांनी टिळक रस्त्याच्या मिरवणुकीला होत असलेल्या उशिराबाबत पोलिस प्रशासनावर ठपका ठेवला व तक्रारींद्वारे विविध प्रश्नही उपस्थित केले होते. त्यांची तड लावण्यासाठी दै. ‘पुढारी’ने शहराचे सह पोलिस आयुक्त शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आश्वासन दिले.
दै. ‘पुढारी’ करणार पाठपुरावा
‘दै. पुढारी गणेशोत्सव व्यासपीठा’वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अनेक समस्या व प्रश्नांची मांडणी केली. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न दै. ‘पुढारी’तर्फे करण्यात येणार असून, त्या प्रयत्नाचाच हा पहिला भाग.