देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने कृष्णनगर झोपडपट्टीसाठी टेलिफोन एक्सचेंजजवळ तीन स्वच्छतागृह बांधली आहेत. पण या स्वच्छतागृहाकडे दुर्लक्षामुळे आता यात कोणीही जात नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाने टेलिफोन एक्सचेंजजवळ 90 हजार रुपये खर्च करून तीन स्वच्छतागृहे बांधली. या तीनही स्वच्छतागृहांकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दुर्लक्ष केले. याची स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी नियमित कोणीही येत नव्हते. त्यामुळे या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
त्यात भर म्हणून की काय कॅन्टोन्मेंट बोर्डाने कचराकुंडी त्याच्यासमोरच आणून ठेवली. आता लोक कचराकुंडीत कमी आणि बाहेर जास्त कचरा टाकतात. यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा मुद्दा आणला होता. त्यांनीही यावर तत्काळ कारवाई करण्यास सांगितले होते. पण कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ढिसाळ कारभाराचे पुन्हा एकदा रूप समोर आले. अधिकार्यांनी इथून कचराकुंडी हलवलीच नाही. त्यामुळे या संडासात जायचे कोणी व कसे, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला.