पुणे: पुण्यातील गुरुवार पेठेतील तब्बल 40 वर्षे जुन्या असलेल्या सराफी पेढीवर चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल तीन पोती चांदीचे 67 लाख 60 हजारांचे 70 किलोहून अधिक दागिने चोरून नेले. यामध्ये 62 लाखांची चांदी तर पाच लाखांच्या रोकडचा समावेश आहे.
ही चांदीने भरलेली पोती (सिमेंटच्या गोणीच्या आकाराची) वाहून नेतानाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. विनोद देवीचंद परमार (वय 41, रा. मुकुंदनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार यांचे 381 गुरुवार पेठ येथे माणिक ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या सराफी दुकानाला लाकडी दरवाजे आहेत. शेजारीच मोठ्या ज्वेलर्सची दुकाने आहेत. त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. परंतु, या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचा व दुकानाला लाकडी दरवाजे असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
सोमवारी (दि.15) मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हे माणिक ज्वेलर्सचे दुकानाचे दरवाजे कटावणीच्या साह्याने तोडले. आतमध्ये शिरल्यानंतर समोरच्या कपाटामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर चांदी असल्याचे दिसली.
त्यांनी चांदीचे पैजण, चांदीचे बेसलेट, देवाच्या मूर्ती, नाणी ही सोबत असलेल्या सिमेंटच्या पोत्यात भरली. तसेच, दुकानात असलेली पाच लाखांची रोकड चोरट्यांनी ताब्यात घेतली. चांदीने भरलेली तीन पोती उचल्यास जड असल्याने चोरट्यांनी शेवटी तीन पोती खांद्यावर वाहून नेली.
या दुकानात काम करणारे कामगार जवळच समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकान फोडलेले दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती आपल्या मालकांना दिली. त्यानंतर मालकांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी याची खबर दिल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घरफोडीत तब्बल 70 किलोहून अधिक चांदी, पाच लाखांची रोकड चोरट्यांनी चोरी करून नेली.
चोरीच्या या प्रकारानंतर खडक पोलिसांची दोन पथके व गुन्हे शाखेची दोन पथके तपासासाठी रवाना केली आहेत. चोरट्यांचा चांदी वाहून नेतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून, चोर चोरी करण्यासाठी पायी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. अर्धा तास चोर ज्वेलर्स शॉपमध्ये होते.
पोलिसांकडून शोध सुरू
चांदीचे होलसेल व्यापारी असल्याने मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने शॉपमध्ये होते. चोरांनी 40 लाख रुपयांचे 45 किलो वजनाचे चांदीचे पैंजण, 13 लाख 50 हजार रुपयांचे 15 किलो वजनाचे हातातील कडे, चैन, बेसलेट, मासोळी, चांदीचे कॉईन, नऊ लाख रुपये किमतीचे 10 किलो वजनाचे गणपती, लक्ष्मी, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती, पाच लाख रुपये रोख आणि 10 हजारांचा डीव्हीआर असा 67 लाख 60 रुपये किमतीचा ऐवज गोणीत टाकून चोरून नेला. या आधारे पोलिसांचा शोध सुरू आहे.