पुणे: स्वारगेट आगारात घडलेल्या गाडे बलात्कार प्रकरणानंतर राज्य शासनाने येथील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. मात्र, प्रशासनाने दोषी आढळलेल्या या दोन अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी बसवले. त्यामुळे सोमवारी (दि.15) स्वारगेट आगाराच्या पाहणी दौऱ्यावर असताना, नियुक्त्या देणाऱ्या एसटीच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला त्यांनी झापले.
नियुक्तीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचे सांगत या महिला अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले तर स्वारगेट आगारातील गाडे प्रकरणात दोषी असलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (डेपो मॅनेजर) तत्काळ बदल्या करण्याचे आदेश दिले. (Latest Pune News)
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (दि.15) अचानक स्वारगेट, शिवाजीनगर आगाराला भेट दिली. या वेळी त्यांनी स्वारगेट आगाराच्या सुरक्षेसह येथील स्वच्छतेचा आढावा घेतला.
स्वारगेट येथील दत्ता गाडे प्रकरणाबाबत गांभीर्य दाखवत, दोषी अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी का नियुक्ती दिल्या, असा सवाल त्यांनी एसटीच्या विभागीय पदावर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांना केला. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. तसेच, प्रशासनाकडे स्वारगेट आगारासाठी आणखी चांगली माणसे नाहीत का, असा प्रश्नही विभागीय अधिकाऱ्यांना केला.
स्वच्छतेचा आव नको; रोज स्वच्छता ठेवा!
दुपारच्या वेळेत मंत्री सरनाईक यांचा ताफा स्वारगेट आगारात झाला. अन् त्यांच्यावर लगेचच संघटनेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा वर्षाव केला. त्यांच्या तक्रारी ऐकत त्यांनी थेट स्वच्छतागृहांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी येथील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाला भेट दिली. नुकतीच स्वच्छता केल्याचे चित्र मंत्र्यांच्या नजरेतून सुटले नाही.
हे पाहून मंत्री सरनाईक अधिकाऱ्यांना म्हणाले, येथील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मी येणार असल्याचे समजल्यामुळे तुम्ही स्वच्छतागृहे साफ केलीत का? माझ्यासमोर स्वच्छतेचा आव आणू नका, मला स्वारगेट एसटी आगार रोज स्वच्छ हवयं, प्रवाशांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड चालणार नाही, असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.
महिला वाहकाला न्याय मिळवून देणार
स्वारगेट आगारामध्ये आल्यावर विविध संघटना, कर्मचाऱ्यांनी आपल्यावर होणारे अन्यायाचा पाढा वाचत, सरनाईक यांना तक्रारी केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या स्वारगेट आगारातील महिला एसटी वाहक (कंडक्टर) अर्चना वासनकर यांनी सरनाईक यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारत, चौकशी करण्याचे आदेश दिले आणि महिला वाहकाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली. याबाबत आम्ही सभागृहात उत्तरे दिली. पत्रकारांनाही उत्तरे दिली. मात्र, आमच्याच अधिकाऱ्यांनी चुकीचे काम करत, दोषी असलेल्या निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा स्वारगेट आगारातच त्याच पदावर बसवले. हे चुकीचे काम केले आहे. ते लवकरच दुरुस्त करणार असून, तत्काळ त्यांच्या बदल्याचे आदेश दिले आहेत.
-प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य