

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : भवानीनगर (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास बारामती-इंदापूर रस्त्यालगत असलेल्या तीन दुकानांचा मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी 43 हजार 800 रुपयांची रोकड व मशिनरी चोरून नेली. भवानीनगर येथे बारामती-इंदापूर रस्त्यालगत निरा डावा कालव्याजवळ संगम अॅग्रो एजन्सी, समृद्धी ऑटोमोबाईल व महालक्ष्मी स्टील ही तीन दुकाने पत्राशेडमध्ये आहेत.
या दुकानांचा मागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. संगम अॅग्रो या औषध दुकानांमधून चोरट्यांनी 15 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. समृद्धी ऑटोमोबाईल या दुकानामधून चोरट्यांनी 20 हजार रुपये रोख चोरून नेले, तसेत महालक्ष्मी स्टील या दुकानातून चोरट्यांनी 8 हजार 800 रुपये रोख तसेच वेल्डिंग मशिन, ग्राइंडर कटिंग मशिन व इतर मशिन तसेच साहित्य चोरून नेले.
हे तिघेही व्यावसायिक गुरुवारी (दि. 10) सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना मागील बाजूचा पत्रा उचकटल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या गल्ल्यांमध्ये पाहिले असता गल्ल्यातील रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. महालक्ष्मी स्टील या दुकानामधील मशिन चोरीला गेल्याचे व्यावसायिकांच्या लक्षात आले.
या घटनेचा भवानीनगर पोलिस क्षेत्राचे सहायक फौजदार बाळासाहेब पानसरे यांनी पंचनामा केला. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे व पोलिस उपनिरीक्षक विजय टेळकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब पानसरे तपास करीत आहेत.