तीन पाझर तलाव गेले चोरीला?

तीन पाझर तलाव गेले चोरीला?

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील तब्बल तीन पाझर तलाव गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चौकशीची मागणी केली आहे. यातील एक म्हणजे आळंदीलगतच्या चर्‍होली खुर्दच्या पाझर तलावाची चौकशी करून अहवाल येत्या पंधरा दिवसांत देण्याचे आदेश भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंके यांनी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिले आहेत. या आदेशाच्या पत्रानंतर लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाझर तलावांची शोधाशोध सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दुष्काळी परिस्थितीत म्हणजे 1972 ते 1987 या पंधरा वर्षात पाणीटंचाई निवरणासाठी महाराष्ट्र शासनाने माती बांधाचे अनेक पाझर तलाव बांधले. त्यासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला. यामध्ये खेड तालुक्यातील चाकणजवळची मेदनकरवाडी, म्हाळुंगे आणि चर्‍होली खुर्द या गावातील पाझर तलावांचा समावेश आहे. प्रत्यक्षात या तीनही गावात त्या वेळी आरक्षित संपादन केलेल्या जागेवर तलाव अस्तित्वात नाही. त्या वेळी संपादित जमिनींची नुकसान भरपाई म्हणून शेतकर्‍यांना पैसे अदा करण्यात आले.

याशिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. तलाव पूर्ण होऊन त्याचे मंजुरीप्रमाणे ठेकेदाराला पैसेही देण्यात आले. केवळ संपादनाची नोंद 7/12 वर झाली नाही. त्याचा गैरफायदा घेत अलीकडच्या काळात काही बिल्डर व भाईंनी तलावाचे भराव सपाट करून तसेच पाणी साठवण होणार्‍या जागेवर भराव करून नंतर या ठिकाणी जागेचे प्लॉटिंग करून विक्री करण्यात आली. त्याद्वारे भरमसाठ माया गोळा करण्यात आली. आजच्या स्थितीला या प्लॉटिंगवर पक्की घरे बांधण्यात आली आहेत.

चर्‍होली खुर्द येथे सन 1987 मध्ये पाझर तलाव झाला होता. त्यासाठी गाव हद्दीतील गट क्र 355 ते 357 तसेच 359 ते 362 हे क्षेत्र संपादित झाले होते. संबंधित पाझर तलावाची रितसर निविदा प्रक्रिया होऊन त्यानंतर पाझर तलाव पूर्ण झाला म्हणून त्या वेळी सुमारे 89 लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा केल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. पण या जागेत आजच्या घडीला असा कोणताही पाझर तलाव दिसून येत नाही. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.

दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने चर्‍होली खुर्द, मेदनकरवाडी, म्हाळुंगे येथे पाझर तलाव केले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला. पण महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे 7/12 वर संपादनाचे शिक्के पडायचे राहून गेले. त्रुटी लक्षात घेऊन अधिकारी आणि बिल्डर व काही भाईंनी या जागा शेतकर्‍यांकडून घेतल्या. दोनदा फायदा होत असल्याने शेतकरी पण तयार झाले. यामध्ये शासनाचा मोठा पैसा लाटण्यात आला आहे. चाकणचे ऐतिहासिक तळे गायब करून ही जागापण लाटण्यात आली आहे.
– दिलीप मोहिते पाटील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news