

बारामती, पुढारी वृत्तसेवा: शेतात जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या खटल्यात येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. देशपांडे यांनी तिघांना दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
भीमदेव रामा गव्हाणे, राहुल भीमदेव गव्हाण व दत्तात्रय भीमदेव गव्हाणे (रा. माळेगाव खुर्द) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बापू यादवराव गव्हाणे यांनी फिर्याद दिली होती.
या खटल्याची हकीकत अशी, दि. 7 सप्टेंबर 2017 रोजी बापू गव्हाणे हे उसाला पाणी देण्यासाठी जात असताना त्यांचे चुलते भीमदेव यांनी त्यांना शिविगाळ करत या रस्त्याने जायचे नाही, गावात राहायचे नाही, तुझ्याकडे बघायचे आहे, असे म्हणत फिर्यादीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादीने घाबरून तेथून मोटारसायकलसह पळ काढत घराकडे जात असताना भीमदेव यांनी मुले राहुल व दत्तात्रय यांना फोन करून आज बाप्याला संपवायचा आहे, लवकर शेताकडे या, असे सांगितले. फिर्यादी कर्हावागज-माळेगाव रस्त्याने घरी जात असताना त्यांच्या अंगावर पीकअप वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सी. बी. बेरड यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड. स्नेहल नाईक यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाला सहाय्यक फौजदार नलावडे व हवालदार ए. जे. कवडे यांचे सहकार्य लाभले.