

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सीरम इन्स्टिट्यूटचे मालक आदर पूनावाला यांच्या नावाने संस्थेच्या अधिकार्यास व्हॉटस्अॅप मेसेज करून एक कोटी रुपये उकळण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. आत्तापर्यंत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य सूत्रधार अद्याप फरारी आहे. बँक खात्यात पैसे जमा झालेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते विविध राज्यांतील आहेत. राबी कौशलप्रसाद गुप्ता (रा. देवा, मध्य प्रदेश), यासीर नाझीम खान (रा. मध्य प्रदेश), प्रसाद सत्यनारायण लोवुडू (रा. विशाखापट्टणम, आंध— प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
यापूर्वी राजीवकुमार शिवजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैयाकुमार संभू महंतो (तिघेही रा. सिवान, बिहार), रवींद्रकुमार हबुनाथ पटेल (रा. गहरपूर, वाराणसी, उत्तर प्रदेश) या चौघांना अटक झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाईलवर 7 सप्टेंबरला सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांचा फोटो व्हॉटस्अॅप डीपी ठेवून त्याद्वारे देशपांडे यांना, 'मी मीटिंगमध्ये व्यस्त आहे. मला फोन करू नका, मी पाठविलेल्या 8 बँक खात्यांवर तत्काळ रक्कम पाठवा' असा मेजेस आला.
देशपांडे यांना संबंधित मेसेज हा पूनावाला यांचाच आहे, असे भासविल्याने त्यांनी संबंधित बँक खात्यांवर एक कोटी 1 लाख 554 रुपये पाठवून दिले. दुसर्या दिवशी देशपांडे यांचे पूनावाला यांच्याशी फोनवरून बोलणे झाले, तेव्हा अशा प्रकारे रक्कम पाठविण्यास आपण सांगितले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर संस्थेचे वित्त व्यवस्थापक सागर कित्तूर यालनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान, पोलिसांनी फसवणूक केलेले पैसे ज्या बँक खात्यावर पाठविण्यात आले, त्या खात्यावरील 13 लाख रुपयांची रक्कम तत्काळ गोठवली. त्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून बँक खात्यावर पैसे जमा झालेल्या सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त आर. एन. राजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नळकांडे, गावडे आणि अंमलदार अमोल सरडे, मनोज भोकरे, संजय वनवे, सागर घोरपडे, सुधीर घोटकुले, किरण तळेकर, ज्ञाना बडे यांच्या पथकाने केली.
कमिशनसाठी बँक खात्याची माहिती
पोलिसांनी तपास करून सीरम कंपनीचे पैसे वर्ग झालेल्या बँक खात्यांची माहिती काढली. त्यानुसार सात आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुख्य आरोपीला त्यांची बँक खाती कमिशनच्या बदल्यात वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी उच्चशिक्षित मुख्य आरोपीने संबंधित आठ बँक खात्यांतील पैसे इतर चाळीस बँक खात्यांत वर्ग केले आहेत. यातील प्रसाद लोबुडू हा संगणक अभियंता आहे, तर राबी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. दोघेही एका बड्या खासगी बँकेत कामाला आहेत. तर यासीन खान बी-टेक झालेला आहे
सीरम इन्स्टिट्यूटच्या एक कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सात जणांना अटक केली आहे. तसेच 13 लाख रुपयांची रक्कम गोठविली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन