बारामतीच्या कोयता गँगमधील तिघांना अटक

बारामतीच्या कोयता गँगमधील तिघांना अटक
Published on
Updated on

बारामती; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. 17) सायंकाळी बारामती शहरासह एमआयडीसी भागात कोयते हातात घेत दहशत माजवत हॉटेल, पेट्रोलपंपावर धिंगाणा घालणार्‍या कोयता गँगमधील सातजणांविरोधात बारामती शहर पोलिसांनी दरोड्यासह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये एका अल्पवयीनचा समावेश आहे. या घटनेत अल्पवयीनासह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. या गँगने माजवलेल्या दहशतीची मोठी चर्चा शहरात झाली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये विशाल माने, शामवेल जाधव (रा. वसंतनगर, बारामती), प्रथमेश मोरे (रा. प्रगतीनगर, बारामती) चैतन्य कांबळे, चिराग नरेश गुप्ता, प्रथमेश विश्वनाथ मोहरे व एक अल्पवयीन युवक (पूर्ण नावे, पत्ते नाहीत) यांचा समावेश आहे. यातील गुप्ता, मोहरे व एक अल्पवयीन या तिघांना पोलिसांनी राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली.

शहरातील पाटस रस्त्यावरीस सराफ पेट्रोल पंपाचे कर्मचारी विक्रम बाबासाहेब पवार (रा. पतंगशहानगर, बारामती) यांनी या पाच जणांविरोधात फिर्याद दिली. शनिवारी फिर्यादी कामावर असताना सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास होंडा शाईन गाडी घेऊन विशाल माने एका अल्पवयीनासह तेथे आला.

त्यांच्या पाठोपाठ चेतन कांबळे, प्रथमेश मोरे व शामवेल जाधव हे दुसर्‍या एका गाडीवर आले. अल्पवयीनाने दुचाकीमध्ये एक हजार रुपयाचे पेट्रोल टाक, पैसे मी देणार आहे, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने पेट्रोल भरले. चेतन कांबळे याने पॅशन गाडीत एक हजाराचे पेट्रोल टाकायला सांगितले, त्या दुचाकीतही पेट्रोल भरण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने विशाल माने याला एक हजार रुपयांची मागणी केली असता तो हिसडा मारून पळून गेला. त्याच्याबरोबर अल्पवयीन युवक व शामवेल जाधव हेदेखील पळून गेले.

त्यांच्या पाठोपाठ चेतन कांबळे व प्रथमेश मोरे हे पळून जावू लागल्यावर फिर्यादीने त्यांना अडवले. दोन हजार रुपये कोण देणार, अशी फिर्यादीने विचारणा केली असता चेतन याने आम्ही बारामतीचे भाई असताना तु आम्हाला पैसे मागतो का, असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. तेवढ्यात माने, जाधव व अल्पवयीन युवक हे तिघे परत आले. त्यांनी फिर्यादीला तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत कोयत्याने त्यांच्यावर वार केला. फिर्यादीने तो चुकवला.

येथील गणेश चांदगुडे यांच्या डोक्यात सत्तूर मारण्याचा प्रयत्न केला असता चांदगुडे यांनी उजव्या हाताने तो अडवल्याने हाताला गंभीर दुखापत झाली. या गोंधळात पेट्रोलपंपावर आजूबाजूचे लोक जमा झाले. परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. मोरे व कांबळे यांनी गाडीवरून उतरत लोकांच्या दिशेने हत्यारे फिरवत दहशत निर्माण केली व दुचाकीवर बसून ते कदम चौकाच्या दिशेने निघून गेले.

दुसर्‍या घटनेत सुहास हनुमंत वरुडे (रा. प्रगतीनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे टी. सी. महाविद्यालयाजवळ पर्न स्नॅक सेंटर आहे. शनिवारी ते हॉटेलात काम करत असताना हॉटेलसमोर आरडाओरडा, लोकांची पळापळ दिसून आली. लोक घाबरून सैरावैरा पळत सुटले होते. येथील पॉकेट कॅफेमध्ये हे पाचजण हातामध्ये लोखंडी तलवारी, कोयते घेऊन फिर्यादीच्या व कॅफेच्या काचा फोडताना दिसले.

हातातील हत्यारे हवेत उंचावून या पाच जणांकडून दहशत निर्माण केली जात होती. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बोलेरो जीप (एमएच 42 एएक्स 8285) व होन्डा कार (एमएच 42 एएक्स 3301) या दोन मोटारींच्या काचा या पाच जणांनी हत्याराने फोडल्या. बोनेटवर कोयते मारत मोटारींचे नुकसान केले. फिर्यादीच्या पर्न स्नॅक सेंटरमध्ये घुसून सामानाची तोडफोड केली.

हॉटेलातील कामगार अमरिश रामलखन चौधरी व रितिक अशोक गुप्ता हे त्यांना अडवू पाहत असताना जाधव याने त्यांच्यावर तलवारीने वार केला. तो हाताने अडवल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली. या घटनेत गुप्ता हा घाबरून हॉटेलबाहेर पळून गेला. पाच जणांच्या टोळक्याने हॉटेलातील सर्व साहित्याची मोडतोड केली. गल्ल्यातील 4200 रुपये जबरदस्तीने काढून घेत ते दोन दुचाकीवरून निघून गेले.

तालुका पोलिस ठाण्यातही दरोड्याचे गुन्हे दाखल
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसीतील एका बारमध्ये चेतन कांबळे, विशाल माने, चिराग नरेश गुप्ता व प्रथमेश विश्वनाथ मोहरे यांच्यासह एका अल्पवयीनाने तोडफोड केली. त्यानंतर तेथून सहाजण दोन दुचाकीवरून शहराच्या दिशेने आले. घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह चिराग गुप्ता, प्रथमेश मोहरे यांना राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळून जात असताना पकडले. शहर पोलिस ठाण्याप्रमाणे तालुका पोलिस ठाण्यातही त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

चेतन कांबळे, विशाल माने, शामवेल उर्फ गोट्या जाधव हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिस त्यांच्या मागावर आहेत. याशिवाय तालुका पोलिसांनी याप्रकरणी पीयुष मंगेश भोसले (वय 19, रा. आमराई बारामती) याला ताब्यात घेत अटक केली. एकूण आठजणांनी बारामती एमआयडीसीत दहशत माजवली. शहरात सहाजण आले होते. हे तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेणारे असून, त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news