भोरला लम्पीने तीन जनावरांचा मृत्यू; अनेक जनावरांना लम्पीची लागण

भोरला लम्पीने तीन जनावरांचा मृत्यू; अनेक जनावरांना लम्पीची लागण

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात लम्पीचा प्रार्दुभाव अद्यापही दूर झालेला नाही. यामुळे शेतीपूरक असलेला पशुधनाचा हक्काचा व्यवसाय अडचणीत आला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील तीन जनावरे आतापर्यंत लम्पी आजाराने दगावली आहेत. हिरडस मावळातील गोळेवाडी येथील दगडू महादू गोळे यांचा खिलार बैल, कुडली खुर्द येथील बाळू कोंडीबा दिघे यांची गाय तसेच आंबवडे खोर्‍यात नाटंबी येथील विठ्ठल खोपडे यांचा खोंड अशी एकूण तीन जनावरे दगावली. तर काही जनावरे आजारी असून संसर्ग वाढत आहे.

हा लम्पी आजार वाढत असल्याने शेतकर्‍यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या जनावरांना औषधोपचार होणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यात औषधांची कमतरता जाणवत असल्याने शेतकर्‍यांना खासगी मेडिकलमधून औषधे उपलब्ध करावी लागत होती. त्यात पश्चिम भाग असल्याने पशू पर्यवेक्षक यांनी जनावरे तपासल्यावर दिलेली औषधे आणण्यासाठी भोरशिवाय पर्याय नसल्याने दूर अंतरामुळे शेतकरी वर्गास ते शक्य नाही. तसेच यासाठी वेळ, पैसा असा भुर्दंड पशुधन मालकाला सोसावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने औषधे उपलब्ध करून द्यावीत व वेळेवर तपासणी व औषधोपचार करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

भोर तालुक्यात लम्पी आजारातील 135 जनावरांपैकी 20 जनावरांना लागण आहे. बाकीची बरी झाली आहेत, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. हिर्डोशी भागात निगुडघर व शिरगाव दवाखान्याअंतर्गत 27 व 30 जनावरे औषधोपचार करून बरी करण्यात आली असल्याचे पशुपर्यवेक्षक संजय कांबळे यांनी सांगितले. तर आंबेघर दवाखान्यांतर्गत एकाच जनावराला लागण झाली असल्याचे पशू पर्यवेक्षक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

लम्पीच्या रोगाची लागण वाढत आहे, त्यामुळे लम्पीची प्रकरणे वाढत असल्याने त्या तुलनेत औषध पुरवठा कमी पडत आहे. त्यात भोरसह पुरंदर व वेल्हा या तीन तालुक्यांना औषध पुरवठा करावा लागत आहे. जी औषधे उपलब्ध होत आहेत त्यांचा वापर करण्यात येत आहे.

                                प्रशांत सोनटक्के, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

लम्पी आजाराचा संसर्ग गोचीड, गोमाशा, चिलट यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गोठ्यात कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे असून बाधित झालेली जणावरे विभक्त ठेवणे गरजेचे आहे. जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना सकस आहार (खाद्य) द्यावा.

     डॉ. पौर्णिमा येवतीकर, पशुधन विकास अधिकारी, भोर पंचायत समिती

औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांशी बोलणे झाले आहे. यापुढे औषधांची कमतरता भासणार नाही. लम्पी लागण झालेल्या जणावरांवर लागलीच संबंधित पशू पर्यवेक्षक यांचेकडून औषधोपचार करून घ्यावेत.

                                    रणजित शिवतरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news