

Obscene video threat
बारामती: महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी ओळख झाल्यानंतर त्या ओळखीतून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. पुढे त्या क्षणाचे फोटो, व्हिडीओ काढत त्या तरुणीला ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी गौरव आदेश निंबाळकर (रा. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सोसह शारीरिक अत्याचार व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणीने याप्रकरणी फिर्याद दाखल केली. नोव्हेंबर 2019 ते मे 2025 या कालावधीत फलटणमधील बुधवार पेठ, आरोपीच्या घराजवळील एक खोली तसेच फलटण येथील लॉज व करंजेपूल (ता. बारामती) येथे हा प्रकार घडला. (Latest Pune News)
फिर्यादी सोमेश्वरनगर येथे शिक्षण घेत असताना तिची गौरव याच्याशी ओळख झाली. सन 2020 मध्ये त्याने फिर्यादीकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला असता त्याने शिवीगाळ करत तिला त्रास देण्यास सुरुवात केली. मी तुझ्या घरच्यांना तुझ्याबाबत काहीही सांगेन, तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊ लागला.
त्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. फिर्यादी घरी एकटी असताना तिला एके दिवशी त्याने गाठले. तू माझ्याशी फोनवर बोलणे बंद का केले, मी तुझ्या घरी आपल्या दोघांचे संबंध असल्याचे सांगतो, अशी धमकी दिली.
त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिच्या बदनामीची भीती दाखवून त्याच्या राहत्या घराजवळील एका खोलीत तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध केले. त्यानंतरही दोन ते तीन वेळा त्याच पडक्या खोलीमध्ये फिर्यादीस नेऊन तिचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केले.
त्यानंतर काही दिवसांनी तिला बोलावून घेत स्वतःच्या दुचाकीवरून तिला फलटणमधील एका लॉजमध्ये नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याचे चित्रण त्याने मोबाइलमध्ये केले. तू जर हा प्रकार घरी सांगितला तर मी फोटो, व्हीडिओ व्हायरल करेन, असे म्हणत तिला ब्लॅकमेल करत त्याने फेब्रुवारी 2024 पर्यंत तिच्याशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले.
त्यानंतर 7 ऑगस्ट 2025 रोजी ती राहत असलेल्या सोमेश्वरनगर येथील खोलीवर येत ’तू माझ्यासोबत लॉजवर चल, नाहीतर मी माझे मोबाइलमध्ये असलेले फोटो, व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल करेन’ अशी धमकी दिली. फिर्यादीस हाताने मारहाण करून तुला सुखाने जगू देणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.